इंदूरमधील वस्तीत स्क्रिनिंग करायला गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर दगडफेक, व्हिडीओ व्हायरल

1177

मध्य प्रदेशमधील इंदूरमधील एका वस्तीत कोरोनाग्रस्तांशी संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर तेथील रहिवाशांनी दगडफेक केली आहे. या दगडफेकीचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून यात मोठ्या संख्येने लोकं दगडफेक करत असल्याचे दिसत आहे. या दगडफेकीत दोन महिला डॉक्टर जखमी झाल्या आहेत.

इंदूरमधील तटपट्टी बखल भागातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर त्या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी पाच आरोग्य कर्मचारी त्या व्यस्तीत गेले होते. त्यांनी कोरोनाग्रस्ताच्या नातेवाईकांची चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर तेथील लोकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांना तेथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोग्य कर्मचारी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यावर दगडफेक करायला सुरुवात केली. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीव मुठीत घेऊन तेथून पळ काढला. या दगडफेकीत दोन महिला डॉक्टर जखमी झाल्या. पोलिसांनी त्या आंदोलकांना रोखल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा जीव वाचला.

इंदूरचे मुख्य आऱोग्य अधिकारी ड़ॉ. प्रवीण जाडीया यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले आहे. ‘आरोग्य कर्मचारी तुमचा जीव वाचविण्यासाठी, तुम्हाला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काम करत आहेत. पण त्या बदल्यात त्यांच्यावर दगडफेक केली जाते हे दुर्दैवी आहे’, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आंदोलकांना लवकरच अटक करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या