केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची कार्यवाही थांबवा, रेल कामगार सेनेची मध्य रेल्वेकडे आग्रही मागणी

मुंबई लोकल चालवणाऱ्या मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरूच आहे. मोटरमनच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱया प्रशासनाविरोधात रेल कामगार सेना आक्रमक झाली आहे. मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची कार्यवाही तातडीने थांबवा, मोटरमनवर दडपशाही करू नका, अशी आग्रही मागणी रेल कामगार सेनेने मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक हिरेश मीना यांच्याकडे केली आहे.

मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या निर्णयाला विरोध करीत कामगार संघटनांनी या महिन्याच्या सुरुवातीला आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर मध्य रेल्वे प्रशासनाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून कोणतीही प्रशासकीय कार्यवाही करणार नसल्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतरही मोटरमनवर सीसीटीव्हीचा वॉच ठेवला जात आहे. एकीकडे प्रशासन कारवाई करणार नाही, असे आश्वासन देते. मग सीसीटीव्हीचा वॉच का ठेवत आहे? असा सवाल रेल कामगार सेनेने उपस्थित केला आहे. मोटरमनच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे प्रशासनाचे धोरण एक प्रकारची दडपशाही आहे. मोटरमन केबिनमध्ये लावलेले सीसीटीव्ही तातडीने हटवा, नव्याने कॅमेरे बसवण्याची कार्यवाही थांबवा, अशी मागणी रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव, रनिंग स्टाफ प्रमुख प्रशांत कमानकर यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे केली आहे.

उपनगरी रेल्वे मार्गावर दररोज लोकलच्या एकूण 1800 फेऱया धावतात. या लोकल गाडय़ा 60 हजार थांबे घेतात. लोकल सेवा सुरू झाल्यापासून मोटरमन प्रामाणिकपणाने गाडय़ा चालवत आहेत. विशेष म्हणजे, मोटरमननी 92 टक्के वक्तशीरपणा जपला आहे. असे असताना मोटरमनच्या प्रत्येक हालचालीवर वॉच ठेवण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महिला मोटरमनचा सीसीटीव्हीला विरोध

मुंबई लोकल चालवणाऱया महिला मोटरमनही सेवेत आहेत. सीसीटीव्हीचा सतत वॉच असल्याने महिला मोटरमनमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. त्यांच्यावरही सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुपरवायझरपासून वरिष्ठ अधिकाऱयांचा वॉच असतो. मोटरमनच्या नियम उल्लंघनाविरुद्ध कायद्यात विविध तरतुदी असताना सीसीटीव्हीचा वॉच ठेवला जात असल्याने महिला मोटरमन तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.