सावधान! अरबी समुद्रात घोंघावतेय चक्रीवादळ!! कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ाला हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात कोरोनाचे टेन्शन आता कुठे थोडे हलके होतेय तोच अस्मानी संकट पुढे येऊन ठेपले आहे. दक्षिण अरबी समुद्रात 15 मेच्या आसपास चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे. परिणामी, राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात मध्यम ते मुसळधार पावसासह ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. पुढचे पाच दिवस, 16 मेपर्यंत हे संकट डोक्यावर घोंघावेल, असा सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

दक्षिण अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती तयार होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मंगळवारी अॅलर्ट जारी केला. वाऱयाचा द्रोणीय भाग तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात गेले काही दिवस अधूनमधून पाऊस पडत आहे. तीच परिस्थिती ‘जैसे थे’ राहून आता मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही जिह्यांत ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. कोकण परिसरात 15 आणि 16 तारखेला हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल. मात्र यादरम्यान वारे ताशी 30 ते 40 किमी वेगाने वाहतील. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याचा हा परिणाम आहे. 15 आणि 16 मे हे दोन दिवस अधिक खबरदारीचे असतील. कारण या दोन दिवसांत वाऱयाचा वेग वाढलेला असेल. मध्य महाराष्ट्र, दक्षिण-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टी भागात वादळी वाऱयासह हलक्या ते मुसळधार पावसाची हजेरी लागेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

मुंबईला धोका नाही

चक्रीवादळाचा मुंबईला धोका नसेल, असे कुलाबा वेधशाळेतील वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले. चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने न येता दक्षिणेकडून आखाती देशांच्या दिशेने पुढे सरकत जाण्याची शक्यता आहे. परंतु या पाच दिवसांत खबरदारी म्हणून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान अधिकाऱयांनी दिला आहे.

अनेक राज्यांसाठी ‘येलो अॅलर्ट’

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) अनेक राज्यांना ‘येलो अॅलर्ट’ जारी केला आहे. दक्षिण अरबी समुद्रात 15 मेच्या आसपास चक्रीवादळाची शक्यता असून ते पुढे उत्तर पश्चिम भागात सरकेल. त्यामुळे महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीसह केरळ, लक्षद्वीप, कर्नाटकमध्ये 14 मेच्या रात्रीपासूनच सतर्कता बाळगण्यात यावी. 14 आणि 15 मे रोजी केरळ, लक्षद्वीपच्या काही भागांत तर 15 रोजी दक्षिण कर्नाटक आणि तामीळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडेल. मच्छीमारांनी 12 मेच्या रात्रीपर्यंत समुद्रातून मागे परतावे, असे ट्विट हवामान खात्याचे वरिष्ठ वैज्ञानिक कृष्णानंद होसाळीकर यांनी केले.