
सामना प्रतिनिधी । जालना
घनसावंगी तालुक्यातील मासेगावला शनिवारी दुपारी 4 ते 5 वाजेदरम्यान वादळाने जोरदार तडाखा दिला. या वादळी वाऱ्यात अनेक ग्रामस्थांच्या घरावरील पत्रे उडाले. तसेच गावातील अनेक वृक्ष उन्मळून पडले. सुदैवाने या वादळात जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणणात वित्तहानी झाली आहे. शनिवारी दुपारनंतर अचानक गडगडाटात पावसाने हजेरी लावल्यानंतर अचानक आलेल्या वादळाने तब्बल एक तास मासेगाव आणि शिवारात थैमान घातले. जोरदार वादळामुळे अनेक ग्रामस्थाच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत. तसेच, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील आंबे, लिंब आणि इतर मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. या वादळाच्या तडाख्यात काही झाडे बुंध्यातून मोडली आहेत. गावातील अनेक शेतकऱ्यांना वादशाचा मोठा फटका बसला आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.




























































