‘एप्रिल फूल’चे रहस्य! वाचा हा विशेष ब्लॉग

294
  • ज्योत्स्ना गाडगीळ

एप्रिल ‘फूल’करण्याची प्रथा कधीपासून सुरू झाली, याबाबत अनेक वादग्रस्त कथा आहेत, ज्या तुम्हाला विकिपीडियावरसुद्धा सापडतील. पण मूळ कथेला कोणीच हात घालत नाहीत. कारण ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ प्रमाणे आजच्या दिवसालाही कारुण्याची झालर आहे.

जॉन आणि केईरा ह्या इंग्लंडच्या प्रेमी युगुलाची ही कथा. जॉन आणि केईरा हे खरे तर बालमित्र. कालौघात आणि सहवासात त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. 1 जानेवारी 1834 रोजी त्यांचा साखरपुडा झाला, पण….त्याच दिवशी जॉनसमोर एक कटू सत्य समोर आलं. त्याची प्रेयसी केइरा जॉनच्या प्रेमात नसून त्याच्या संपत्तीच्या प्रेमात होती आणि लग्न होताच जॉनचा काटा काढून ती आपला दुसरा प्रियकर आलबर्ट याच्याशी विवाह करणार होती. केइरा आणि जॉन ह्यांच्या कॉमन फ्रेंडने हे सत्य जॉन पर्यंत पोहोचवले होते. जॉनला हे सत्य पचवणे खूप यातनादायी होते. पण त्यानेही केइराचा बदला घेण्याचा निश्चय केला. तिच्याशी विवाह करून तिला अद्दल घडवायची, असा त्याने निश्चय केला. केईराला ज्या संपत्तीचा मोह होता, ती संपत्तीच जॉनने आपल्या त्या वेल विशर मित्राच्या नावे केली.

1 एप्रिल 1834 रोजी केइरा आणि जॉन फादर, आप्तेष्ट आणि मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत विवाहबद्ध झाले. चर्च मधून बाहेर पडताना आपण कफल्लक झाल्याचे जॉनने उघड केले. केइराने खुलासा मागितला. त्यावर जॉनने केईराचा पर्दाफाश झाल्याचे सांगितले. सदर माहिती आपल्याला कॉमन फ्रेंड कडून मिळल्याचेही त्याने उघड केले. त्याचा मूर्खपणा आणि अविश्वास पाहून केईरा त्याक्षणी जॉनच्या आयुष्यातून कायमची निघून गेली. भिकेला लागलेला जॉन एकाच वेळी आपली संपत्ती आणि प्रेयसी गमावून बसला. ह्या धक्क्यापायी तो फार काळ जगू शकला नाही. त्याच्या स्मरणार्थ श्रीमंत झालेल्या ‘त्या’ कॉमन फ्रेंडनी हा दिवस ‘जॉन एप्रिल फूल’ दिवस नावाने साजरा करण्यास सुरुवात केली. जॉनचे आयुष्य लोकांच्या थट्टेचा विषय झाला आणि कालांतराने लोकांना त्याच्या नावाचा विसर पडला. मात्र हा दिवस खोड्या काढण्याचा, उल्लू बनवण्याचा अधिकृत दिवस म्हणून साजरा होऊ लागला.

सदर कथा तुम्हाला कोणत्याच पुस्तकात, ग्रंथात किंवा गुगलवर सापडणार नाही. कारण….
ही कथा आताच सुचली आणि कागदावर आली. ही कथा वाचून जॉनप्रमाणे तुमचीदेखील फसवणूक झाली असेल तर त्याचे शल्य बाळगू नका. अशी ‘फूलं’ खरी देवाघरची निरागस मुलं असतात. आता एकट्याने हसून कथेतलं गूढ सम्पवू नका. स्थितप्रज्ञ होऊन आणखी एखाद्या जॉनपर्यंत ही कथा पोहोचवा.

आपली प्रतिक्रिया द्या