कळवणची स्ट्रॉबेरी गुजरातमध्ये दाखल, 100 ते 150 रुपये दराने विक्री

803
strawberry from kalvan in gujarat

कळवण तालुक्यात पारंपरिक पिके घेणाऱ्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी शेतकऱ्याने शास्रशुद्ध पद्धतीने स्ट्रॉबेरीचे पीक घेण्यास सुरुवात केली आहे. आता कळवणची स्ट्रॉबेरी गुजरातमध्ये दाखल होऊन भाव खात आहे. 100 ते 150 रुपये किलो दर मिळत असल्याने आदिवासींच्या कष्टाला गोडवा आला असून या वर्षीची सुरुवात स्ट्रॉबेरीधारक शेतकऱयांसाठी समाधान देणारी आहे.

तालुक्यातील पश्चिम पट्टय़ात सुकापूर, वडापाडा, खिराड, पळसदर, लिगामे, आमदर, बापखेडा, वीरशेत परिसरातील आदिवासी शेतकरी गेल्या आठ ते दहा वर्षांपासून स्ट्रॉबेरी प्रयोग यशस्वीरीत्या करत आहेत. तालुक्याच्या पश्चिम पट्टय़ात आदिवासी भागात स्ट्रॉबेरीने नगदी पीक म्हणून स्वतःची ओळख तयार केली असून या भागातील शेतकरी कृषी विभागाच्या मदतीने स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळला आहे. कमीत कमी जागेत जास्त स्ट्रॉबेरीला दरवर्षी प्रतिकिलो 100 ते 200 रुपये जास्तीत जास्त व कमीत कमी 80 ते 100 रुपये भाव मिळत असल्याने आदिवासी शेतकरी या शेतीकडे वळला आहे. शेजारील गुजरात राज्यात या स्ट्रॉबेरी सूरत, बिल्लीमोरा, वघई, भरूच, वाझदा येथे पाठवले जातात.

यावर्षी स्ट्रॉबेरीचे फळ 15 दिवस लवकर असून गुजरातमध्ये सध्या मोठी मागणी आहे.

विंटर डॉन, राणी, सेल्वा, चार्लस्वीट पजारो, आसो ग्रॅण्डी आदी स्ट्रॉबेरीच्या जातीची रोपे येथील आदिवासी शेतकरी महाबळेश्वर येथून 10 ते 15 रुपये भावाने आणत आहेत.

चांगल्या स्ट्रॉबेरीला मोठी मागणी

कळवण येथे पश्चिम पट्टय़ातील स्ट्रोबेरी विक्रीसाठी गुजरात राज्यात दाखल झाली असून तेथील बाजारपेठेत चांगलाच भाव खात आहे. येथे स्ट्रोबेरीला 100 ते 150 रुपये प्रति किलोला भाव मिळत असून दर्जेदार स्ट्रॉबेरीला मोठी मागणी असून सुरुवातीलाच ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

खर्च व उत्पन्नाची आकडेवारी

एकरी उत्पादन — 10 टन
बाजारभाव — साधारण 100 रुपये किलो
उत्पादन व विक्री खर्च — एकरी 4 ते 5 लाख
निव्वळ उत्पन्न — 4 ते 5 लाख रुपये

कृषी विभागाच्या मदतीने मिळालेल्या प्रशिक्षणामुळे स्ट्रोबेरी पिकाच्या उत्पादनात वाढ झाली असून स्ट्रोबेरीसारख्या पिकामुळे दोन पैसे मिळत आहेत. या वर्षी गुजरात राज्यात जास्त मागणी असून वाढलेल्या मागणीमुळे व चांगल्या बाजारभावामुळे शेतकऱयांना या वर्षी चांगले पैसे मिळतील असे दिसते.

– मधुकर जाधव, शेतकरी

मार्केटची गरज

स्ट्रॉबेरी हे फळ कमी दिवस टिकणारे असल्यामुळे व जवळ मार्केट नसल्यामुळे ते शक्य त्या भावात द्यावे लागते. प्रक्रिया उद्योग करून त्यापासून जाम, ज्यूस किंवा आईस्क्रीम फ्लेवर ड्राय पावडर आदी गोष्टी झाल्या तर स्ट्रॉबेरी हे पीक हिंदुस्थानी शेतीला पर्याय आणि व्यावसायिक बळ देणारे ठरेल. त्यामुळे परिसरात मार्केट होण्याची गरज आहे.

– प्रदीप दळवी, शेतकरी

350 एकरवर लागवड

तालुक्यातील पश्चिम पट्टय़ातील हवामान हे स्ट्रॉबेरी पिकासाठी अतिशय योग्य असून या ठिकाणी किमान 350 एकरवर स्ट्रॉबेरी लागवड केल्याची कृषी विभागाकडे नोंद असून प्रत्येक वर्षी स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱयांमध्ये वाढ होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या