
सह्याद्रीच्या कुशीतला महाबळेश्वर, वाई आणि जावली तालुका पुन्हा एकदा गोडसर सुगंधाने दरवळू लागला आहे. मदर प्लाण्टमधून तयार झालेली स्ट्रॉबेरीची रोपे शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणावर लावत आहेत. सप्टेंबरच्या सुरुवातीलाच या लागवडीला वेग आला असून, येत्या दिवाळीतच पर्यटकांना ताजी, रसाळ आणि दर्जेदार स्ट्रॉबेरीची चव चाखायला मिळणार आहे.
या भागात दरवर्षी २५०० ते ३००० एकरांवर स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. थंड हवामान, सुपीक जमीन आणि योग्य हवामानातील बदल यांमुळे महाबळेश्वर तालुका स्ट्रॉबेरीचे प्रमुख केंद्र ठरतो. यंदाही भिलार, राजपुरी, खिंगर, दानवली, कासवंड, आंब्रळ, भोसे, पांगारी आदी भागांत शेतकऱ्यांनी रोपे लावण्याचे काम गतिमान केले आहे.
स्ट्रॉबेरी हंगामामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चांगलीच चालना मिळते. जॅम, जेली, वाइन, प्रक्रिया उद्योग, तसेच पर्यटनक्षेत्रात हजारो लोकांना रोजगार मिळतो. देशभरातून येणारे पर्यटक दरवर्षी महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची आतुरतेने वाट पाहतात. यंदाच्या हंगामात गोडसर चवीची, बारकोड टॅग असलेली महाबळेश्वर स्ट्रॉबेरी दिवाळीपूर्वीच बाजारात उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांबरोबर पर्यटकांमधून आनंद व्यक्त होत आहे.
यंदाचा हंगाम खास
यंदा महाबळेश्वर स्ट्रॉबेरी अधिक खास ठरणार आहे. ‘स्ट्रॉबेरी ग्रोवर्स असोसिएशन’च्या पुढाकाराने महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला विशेष बारकोड टॅग देण्यात आला आहे. त्यामुळे देशभरात कुठेही लागवड झालेली स्ट्रॉबेरी ‘महाबळेश्वर स्ट्रॉबेरी’ या नावाने विक्रीस ठेवता येणार नाही. हा निर्णय ऐतिहासिक ठरला असून, दर्जेदार उत्पादनाचे खरे औचित्य आता ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे.
महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला मिळालेला टॅग हा शेतकऱ्यांसाठी अभिमानाचा क्षण आहे. यामुळे बाजारपेठेत केवळ महाबळेश्वरची खरी स्ट्रॉबेरीच पर्यटकांना मिळेल आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यास मदत होईल.
नितीन भिलारे, अध्यक्ष, स्ट्रॉबेरी ग्रोवर्स असोसिएशन