केजमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, 13 जणांना चावून केले जखमी

159

सामना प्रतिनिधी, केज

केज शहरात शनिवारी रात्री नऊ वाजता केजडीपुला नजीक पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत रस्त्यावरुन जाणार्‍याच्या पायाला कडाडून चावा घेतल्याने 13 जण गंभीर जखमी झाले तर पिसाळलेल्या कुत्र्याने अनेक दुचाकीस्वारांच्या दुचाकीचा पाठलाग केला.

केज शहरातील धारुर चौकासह केजडी पुल व मंगळवार पेठ कॉर्नरला पिसाळलेल्या कुत्र्याने शनिवारी दुपारपासून धुमाकूळ घातला. पिसाळलेल्या कुत्र्याच्या गळ्यात साखळी असून शनिवारी रात्री नऊ वाजता केज शहरातील उपजिल्हा रुग्णालयात वास्तव्यास असलेले बाबा मस्के हे त्यांच्या मुलाला घेऊन केज शहरात दुचाकीवरून येत होते. केजडी पुलाजवळ त्यांची दुचाकी येताच पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्या दुचाकीवर हल्ला चढवून पाठीमागे बसलेल्या त्यांच्या मुलाच्या पायास कडकडुन चावा घेतला. तेव्हा ते मोटारसायकल सह खाली पडल्यावर कुत्र्याने धूम ठोकत रस्त्यावरून जाणार्‍या दुसर्‍या दुचाकीस्वारावर हल्ला चढवला मात्र त्यांचे नाव समजू शकले नाही.

पिसाळलेला कुत्रा दुचाकीस्वाराचा पाठलाग करत असल्याने रस्त्यावरून वागणार्‍या दुचाकीस्वारात कुत्र्याची दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान दुपारपासून या कुत्र्याने रस्त्यावर दहशत निर्माण केली असल्याचे नागरिकांनी सांगितले. मुदतसर मुजीद खुरेशी नासेर सौदागर यांच्याही पायास पिसाळलेल्या कुत्र्याने कडकडून चावा घेतल्याने त्यांच्या पायास गंभीर जखम झाली. कुत्रे चावून जखमी झालेल्याना उपजिल्हा रुग्णालयात रेबीज लस उपलब्ध नसल्यामुळे उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयातून अंबाजोगाई येथे हलविण्यात आले. अशा मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या