डहाणूतील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, चार गावातील शाळकरी मुलांसह रुग्ण, गावकऱ्यांचा देवावर हवाला

विविध प्रकल्पांवर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत असताना आदिवासीबहुल तालुका असलेल्या डहाणूत मात्र ग्रामस्थांचे पुलाअभावी अतोनात हाल होत आहेत. कोसेसरी, भवाडी व लगतच्या तीन ते चार गावांमधील विद्यार्थ्यांना होडीतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सूर्या नदीवर पूल नसल्यामुळे होडी किंवा तराफ्याचा आधार घ्यावा लागत असून शाळकरी मुलांसह रुग्ण आणि गावकऱ्यांचा फक्त देवावर हवाला आहे. जीवावर उदार होऊन होडीतील धोकादायक प्रवास रोज करावा लागत असल्याने ग्रामस्थांनी सरकारला तुमचा विकास नेमका कुठे आहे, असा सवाल केला आहे.

सूर्या नदीवर पूल उभारावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या एक दिवस आधी घाईगडबडीत या पुलाला मान्यता देण्यात आली. त्यासाठी सुमारे २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

पुलाच्या कामाचे उद्घाटनही वाजत गाजत पार पडले होते. या कार्यक्रमाला पालघरचे अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. पण उ‌द्घाटन झाल्यानंतर पुलाचे काम अजून पुढे सरकलेले नाही.

सूर्या नदीला पावसाळ्यात दरवर्षी मोठा पूर येतो. त्यामुळे नदी पात्रामध्ये प्रचंड पाणी असते. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचा प्रवास जास्तच धोकादायक होत असतो. माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कासा किंवा डहाणूला जावे लागते. मात्र सूर्या नदीवर पूल नसल्यामुळे मुले नावेतून किंवा तराफ्यातून नदी पार करत कसीबसी शाळा गाठतात. कासा किंवा तलवाडा येथे पोहोचण्यासाठी सायवनमार्गे १८ ते २० किलोमीटरचा मोठा वळसा घालावा लागतो. या मार्गावर प्रवासी वाहनांची संख्या कमी असून वेळ आणि पैसा अधिक लागतो. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थी व नागरिकांना नाईलाजाने सूर्या नदीतून होडीने प्रवास करावा लागतो.

येथे कायमस्वरूपी पूल व्हावा यासाठी निधी मंजूर झाला असून उद्घाटनही झाले आहे. मात्र बांधकामाची गती अत्यंत संथ आहे. प्रशासनाने तातडीने काम पूर्ण करून विद्यार्थ्यांचा व ग्रामस्थांचा धोकादायक प्रवास थांबवावा.

शैलेश करमोडा (माजी जिल्हा परिषद सदस्य)

प्रवासासाठी गावकऱ्यांनी लाकडी होड्या व दोन्ही बाजूंना दोरी बांधून ठेवली आहे. याच छोट्या होडीतून विद्यार्थी शाळेत जातात व नागरिक बाजारहाटचे सामान नेतात. कधीही दुर्घटना घडू शकते, त्यामुळे पूल तत्काळ पूर्ण करावा.

रत्ना राबड (पालक)

या पुलासाठी २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून बांधकाम सुरू आहे. मात्र सध्या निधीअभावी काम संथगतीने सुरू आहे. निधी लवकर मिळावा यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असून काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महेंद्र किनी (कार्यकारी अभियंता)