विद्यार्थ्यानं पंतप्रधान मोदींना विचारला ‘आऊट ऑफ सिलॅबस’ प्रश्न; वाचा काय मिळालं उत्तर

pm modi pariksha pe charcha

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज विविध विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून होत असलेल्या टीकेबद्दल विचारलं असता त्यांनी ‘आऊट ऑफ सिलॅबस’ असं उत्तर दिलं. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात एका विद्यार्थ्याला उत्तर देताना पंतप्रधान पुढे म्हणाले की,’परीक्षेत ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य आलं नाही तर तुम्ही म्हणतात की हा ‘Out Of Syllabus’, तसं हा प्रश्न ‘Out Of Syllabus’ आहे. टीका (आलोचना) ही समृद्ध लोकशाहीची पहिली अट आहे. माझ्यादृष्टीनं टीका म्हणजे एकप्रकारचा शुद्धी यज्ञच आहे’.

हा ‘प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचा आहे. मला वाटतं की टीका अटळ आहे आणि समृद्ध लोकशाहीसाठी तो शुद्धीकरणाचा यज्ञ आहे’, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. आलोचना (टीका) हा आरोप होत नाही. टीका आणि आरोप यातला फरक लक्षात घ्या. जर तुम्ही मेहनत घेतली आहे, प्रामाणिक कृती केली आहे, तर आरोपांचा बिलकूल विचार करू नका. मात्र आलोचना (टीका) हा अभ्यासाचा विषय आहे. टीका का होत आहे ते समजून त्यावर काम केलं पाहिजे, असं मोदी म्हणाले.

त्यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ च्या सहाव्या वर्षी लाखो विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. बोर्डाच्या परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांशी त्यांचा गेल्या सहा वर्षांपासून वार्षिक संवाद सुरू असतो.

सकारात्मक टीका आणि ‘अनावश्यक व्यत्यय’ यातील फरक अधोरेखित करताना, मोदींनी पालकांना मुलांवर गुणांसाठी अवाजवी दबाव न टाकण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला.

‘जर तुम्ही मेहनती आणि प्रामाणिक असाल, तर तुम्ही टीकेची पर्वा करू नका कारण ती तुमची ताकद बनतात’, असं त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं.

त्यांनी त्यांना त्यांच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले.

‘कुटुंबाकडून अपेक्षा असणे स्वाभाविक आहे, परंतु जर कुटुंब सामाजिक स्थितीकडे पाहत असेल तर ते निरोगी नाही. दबावाचं दडपण घेऊ नका. लक्ष केंद्रित करा’, असं ते म्हणाले.

‘विचार करा, विश्लेषण करा, कृती करा आणि मग तुम्हाला जे हवे आहे ते साध्य करण्यासाठी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा’, असं पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना वेळेच्या व्यवस्थापनाचे महत्त्वही समजावून सांगितलं. ‘वेळ व्यवस्थापन हे केवळ परीक्षांसाठीच नाही तर तुमच्या दैनंदिन जीवनातही महत्त्वाचे आहे. फक्त तुमच्या कामाला प्राधान्य द्या. तुम्ही तुमच्या आईचं निरीक्षण केलं, तर तुम्हाला तुमचा वेळ कसा सांभाळायचा हे समजेल’, असं ते म्हणाले.

परीक्षेत चुकीच्या माध्यमांचा वापर करण्याच्या विरोधातही ते जोरदार बोलले.

‘काही विद्यार्थी परीक्षेत ‘फसवणूक’ करण्यासाठी त्यांच्या सर्जनशीलतेचा वापर करतात. जर त्या विद्यार्थ्यांनी त्यांचा वेळ आणि सर्जनशीलता चांगल्या प्रकारे वापरली तर ते यश मिळवू शकतात. आपण आयुष्यात कधीही शॉर्टकटचा पर्याय निवडू नये’, असंही मोदी म्हणाले.

पीएम मोदींनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानानं विचलित होऊ नये आणि आठवड्यातून एकदा ‘डिजिटल उपवास’ स्वीकारण्यास सांगितलं. ‘देशातील लोक स्क्रीनवर सरासरी 6 तास घालवतात. तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संवाद साधण्यासाठी मोबाइल कधी वापराल याचा वेगळा वेळ ठेवा’, असंही ते म्हणाले.

परीक्षा पे चर्चामध्ये सहभागी होण्यासाठी यावर्षी 38 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 16 लाखांहून अधिक राज्य मंडळांचे आहेत.