
दिवाळीच्या सुट्टीनिमित्त दिलेला होमवर्क पूर्ण न केल्याने खासगी ट्युशनच्या महिला शिक्षिकेने मुलीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
घाटकोपर येथे तक्रारदार राहतात. त्याची एक 13 वर्षांची मुलगी आहे. ती घाटकोपर येथे एका ठिकाणी खासगी शिकवणीला जाते. गेल्या आठवडय़ात मुलगी टय़ुशनवरून घरी रडत रडत आली. ती घरी रडत आणल्याने तिच्या वडिलांनी तिला विचारणा केली. तेव्हा तिने घडल्या प्रकाराची माहिती तिच्या वडिलांना दिली.
दिवाळीनिमित्त सुट्टी असल्याने एका शिक्षिकेने तिला होमवर्क दिला होता. तिचा तो होमवर्क पूर्ण नव्हता. जेव्हा मुलगी शिकवणीला गेली, तेव्हा तिला होमवर्कबाबत विचारणा केली. होमवर्क पूर्ण न झाल्याने शिक्षिकेने तिला छडीने हातावर मारहाण केली. छडीने मारहाण केल्याने मुलीचा हात पूर्णपणे लाल झाला होता. हा प्रकार लक्षात येताच मुलीच्या वडिलांनी जाऊन त्या शिक्षकेला जाब विचारला. तेव्हा तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर शिक्षिकेने त्या मुलीने जर होमवर्क केला नाही तर रोज अशाच प्रकारे मारणार अशी धमकीदेखील दिली. घडल्या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्या तक्रारीची दखल घेऊन घाटकोपर पोलिसांनी शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

























































