
विद्यापीठ आणि महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. पण आता राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीमुळे विद्यार्थी निवडणुका यंदाच्या शैक्षणिक वर्षात होतील की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयीन स्तरावर सप्टेंबर 2019 मध्ये विद्यार्थी निवडणुका घेण्याचे ठरले होते. या निवडणुकांनंतर ‘स्टुडंट कौन्सिल’ अस्तित्वात येणे आवश्यक होते, मात्र विधानसभा निवडणूकदेखील याचदरम्यान होत असल्याने विद्यार्थी निवडणुकांचा इतिहास पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून माजी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थी निवडणुका पुढे ढकलल्या. विधानसभा निवडणूक पार पडली, पण सरकारच स्थापन न झाल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी निवडणुका घेण्याबाबतचा आदेश रेंगाळला आहे.
यंदा राज्यात नवीन विद्यापीठ कायदा लागू करण्यात आला. या कायद्यात विद्यार्थी निवडणुकांची तरतूद आहे. त्यानुसार निवडणुकांची नियमावली जाहीर करण्यात आली, मात्र या वर्षी तरी महाविद्यालयांत विद्यार्थी निवडणुकांचा गुलाल उधळेल असे वाटत नाही.
नोव्हेंबर महिन्यापर्यंत विद्यार्थी निवडणुकांविषयी कार्यवाही करू नये अशा सूचना विद्यापीठाला तत्कालीन सरकारमधील उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मिळाल्या आहेत. आता नव्याने सरकार स्थापन झाल्यावर विद्यार्थी निवडणुकांविषयी निर्णय होणे अपेक्षित आहे.
– सुनील पाटील, संचालक, विद्यार्थी कल्याण मंडळ, मुंबई विद्यापीठ


























































