सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईतील सोमय्या महाविद्यालयात एका विद्यार्थ्यांचा रस्सीखेच खेळताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी 10 च्या दरम्यान ही घटना झाली. जीबीन सनी (22) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमय्या महाविद्यालयाचा मैदानावर सकाळी रस्सीखेच हा खेळ सुरू होता. दोन्ही बाजूने विद्यार्थी जोराने रस्सी खेचत होते. दोन्ही बाजूला उभे असणारे त्यांचे वर्गमित्र आणि विद्यालयातील विद्यार्थी त्यांना प्रोत्साहन देत होते. डाव ऐन रंगात आला असतानाच सर्वात पुढे उभा असणारा जीबीन जागीच कोसळला. सुरुवातीला कोणाला काही कळलेच नाही. जेव्हा भानावर आले तेव्हा जीबीनचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर उपस्थितांनी त्याला रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
जीबीन हा माजगाव येथील रहिवासी होता आणि नर्सिंगचे शिक्षण घेत होता. जीबीनचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
























































