महापालिका शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढतेय; शिक्षण विभागाचा दावा

महापालिकेच्या शाळांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. १३४ शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३मध्ये ४८ हजार १५३, २०२३-२४मध्ये ५० हजार ५८१, तर शैक्षणिक वर्ष २०२४-२५मध्ये ५० हजार ७४९वर पोहोचली आहे. चालू शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये ही संख्या ५४ हजार ४१८ इतकी झाली आहे. यामध्ये मुलींचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. २०२२-२३मध्ये २४ हजार ७८८वरून २०२३-२४मध्ये २५ हजार ९०२ आणि शैक्षणिक वर्ष २०२४-२६मध्ये २५ हजार ९२२ झाले आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेशसंख्या दरवर्षी वाढत आहे. ‘क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया’च्या मूल्यमापनानुसार प्रारंभीच्या पातळीवरील विद्यार्थ्यांचे प्रमाण शैक्षणिक वर्ष २०२३-२४मधील २८ टक्क्यांवरून वर्ष २०२४-२५मध्ये १३ टक्क्यांवर आले, तर उच्च पातळीवर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ०.५ टक्क्यांवरून सहा टक्क्यांपर्यंत वाढले आहे. इयत्ता दुसरीतील प्रारंभी पातळीवरील विद्यार्थी ३० टक्क्यांवरून सात टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत, तर प्रगत विद्यार्थ्यांचे प्रमाण ० टक्क्यावरून थेट २५ टक्क्यांवर गेले आहे.

२११ बालवाड्यांमधील सहा हजारांपेक्षा जास्त मुलांसाठी बालसुलभ वर्गखोल्या आहेत. मूल्यमापनात प्रारंभिक साक्षरता, अंकगणित व इतर कौशल्यांमध्ये २०-२४ टक्के सुधारणा आढळली आहे. याशिवाय ‘स्पंदन’ कार्यक्रम सामाजिक-भावनिक शिक्षण व जीवनकौशल्यांवर भर देत आहे.

‘इंग्रजी अॅज सेकंड लैंग्वेज’ उपक्रमाअंतर्गत २७ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी इंग्रजी भाषेचा वापर करीत आहेत. ‘द आर्ट बॉक्स’ प्रदर्शन व ‘जल्लोष शिक्षणाचा’ यांसारखे सांस्कृतिक उपक्रम विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन विस्तारण्यास मदत करीत आहेत. तर, ‘भारत दर्शन’ दौऱ्यांतून गुणवंत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक अनुभव मिळत आहेत. महापालिकेने ‘एनसीपीसीआर’ व ‘एनसीईआरटी’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शाळा सुरक्षा लेखापरीक्षण सुरू केले आहे. पोलीस विभागाच्या ‘पोलीस काका’ व ‘दामिनी स्क्वॉड’ यांच्या सहकायनि, तसेच ‘मुस्कान फाऊंडेशन’ व ‘अर्पण’ यांच्या माध्यमातून शाळांमध्ये बालसंरक्षण प्रशिक्षण दिले जात आहे. शाळांमध्ये सध्या २३ समुपदेशक कार्यरत असून, शाळा व्यवस्थापन समित्या सुरक्षा व बालसंरक्षण उपाययोजनांवर काटेकोरपणे लक्ष देत आहेत.

शालेय साहित्याच्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच ‘डीबीटी’पासून ते थेट डिजिटल वर्गखोल्यांपर्यंत, वाचनालयांपासून कला शिक्षकांपर्यंत, ‘क्यूसीआय’च्या मूल्यमापनापासून प्रत्यक्ष उपक्रमांपर्यंत विविध सुधारणा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये केल्या असून, त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. पालकांनादेखील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांतील दर्जेदार शैक्षणिक सुविधांची माहिती दिली जात असून, त्यामुळे प्रवेशसंख्येत वाढ होत आहे.
– प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त

शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४मध्ये ८०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यंदा ही संख्या वाढून ८७४ झाली आहे. त्यात मुलींची संख्या ४०५ वरून ४५८वर पोहोचली आहे. ‘पीएम श्री’ योजनेमुळे आम्हाला खासगी शाळांसारख्या सुविधा मिळाल्या आहेत, ज्यामध्ये रोबोटिक्स व इनोव्हेशन लॅबचाही समावेश आहे. ‘सक्षम’ उपक्रमामुळे आमचे विद्यार्थी अधिक सुसज्ज झाले आहेत.
– स्नेहल मोरे, मुख्याध्यापिका, ‘पीएम श्री’ पीसीएमसी पब्लिक स्कूल, चिखली