गुजरातच्या शिक्षकांचा प्रताप; 50 गुणांच्या पेपरमध्ये दिले 80 गुण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाइन । अहमदाबाद

शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवून त्यांच्या व्यक्तीमत्वाचा कायापालाट करू शकतात. मात्र, गुजरातमध्ये शिक्षकांनी प्रताप केल्यामुळे एका विद्यार्थ्याला 50 गुणांच्या गणिताच्या पेपरमध्ये 80 गुण देण्यात आले आहे. मात्र, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गुजरात सीनिअर अॅण्ड हायर सेंकडरी एज्युकेशन बोर्डाला यावर खुलासा करण्याची नामुष्की ओढवली आहे. ज्या शिक्षकाने विद्यार्थ्याला 50 पैकी 80 गुण दिले आहेत,त्या गुणपत्रिकेची फेरतपासणी केली असता त्या विद्यार्थाला फक्त ८ गुणच मिळाल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती तपास अधिकारी एम.एम. पठान यांनी दिली.

कॉपी प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाने या शिक्षकासह एकूण 3,200 शिक्षकांना पेपर तपासणीत गडबड केल्याबाबत समन्स बजावले आहे. यातील 10 गुणांपेक्षा जास्त गुणांची गडबड केली आहे, त्यांची चौकशी होणार आहे. विज्ञान विषयात 657 शिक्षकांनी 10 गुणांपेक्षा जास्त गुण खिरापतीत वाटल्याचे उघड झाले आहे. शिक्षकांना प्रत्यक्ष बोलावून त्यांच्या चुका दाखवून देण्यात येणार आहेत. त्यांच्या चुकांमुळे बोर्डाच्या प्रतीमेला धक्का पोहचला आहे. तसेच हा एक चेष्ठेचा विषय झाला आहे. बोर्डाची प्रतिष्ठा राखण्याबाबत त्यांना समज देण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्यासाठी एकेक गुण महत्वाचा असतो, याची जाणीवही शिक्षकांना करून देणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले.

विज्ञानाच्या पेपरमध्ये एका विद्यार्थ्याला 15 तर दुसऱ्याला 13 गुण जास्त देण्यात आले आहेत. गुणांची बेरीज करताना ही चूक झाली आहे. मात्र, बोर्डाच्या गुणपत्रिका तपासणीत गुणांचा दोनवेळा ताळेबंद करण्यात येत असतानाही ही चूक कशी झाली, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, ही चूक कोणाच्याही लक्षात कशी आली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. दोनदा ताळेबंद करण्यात येऊनही अशा चुका राहणे गंभीर बाब आहे. त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेऊन शिक्षकांना समन्स बजावण्यात आल्याचे परीक्षा सचिव आर.एच. जुनाकिया यांनी सांगितले.