घड्याळ चोरीचा आरोप करत विद्यार्थ्याला बेदम मारहाण, कॉलेजला टाळं लावत शिक्षक पळून गेले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घड्याळ चोरल्याचा आरोप करून एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना कन्नोज येथे घडली आहे. गंभीर म्हणजे या विद्यार्थ्याला मारहाण करून महाविद्यालयाला टाळं लावून शिक्षक पळून गेले असून या मारहाणीत सदर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

ही घटना कन्नौज जिल्ह्यातील छिबरामऊ येथील इंटर कॉलेज परिसरात घडली. या संस्थेत शिकणाऱ्या दिलशान उर्फ राजा हा विद्यार्थी 23 जुलै रोजी नववीत प्रवेश घेण्यासाठी गेला होता. याच दिवशी दुपारी शिवकुमार यादव या शिक्षकाने दिलशानवर घड्याळ चोरी केल्याचा आरोप केला.

यादव याने त्याचा सहकारी प्रभाकर आणि विवेक यादव यांच्यासह दिलशानला एका खोलीत बंद केलं आणि त्याला मारहाण केली. ही मारहाण इतकी गंभीर होती की दिलशान यात जखमी झाला. मारहाणीनंतर हे तिघेही कॉलेजला टाळं लावून फरार झाले.

दिलशान याला शोधणाऱ्या त्याच्या कुटुंबाला तो गंभीर अवस्थेत एका खोलीत सापडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला रविवारी संध्याकाळी कानपूर येथे दाखल करण्यात आलं. तिथे उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेतील तिन्ही आरोपी सध्या फरार आहेत.