इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांची न्यायालयात धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai bombay-highcourt

सामना प्रतिनिधी । मुंबई

इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्यावर्षाच्या जागांचे प्रमाण 20 वरून 10 टक्के करण्याच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. प्रवेश क्षमता कमी करण्याचा निर्णय तडकाफडकी न घेता सध्या इंजिनीअरिंग पदविका अभ्यासक्रम करणाऱ्याविद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर हा निर्णय अमलात आणावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

इंजिनीअरिंग पदवीधारक, विज्ञान शाखेतील माहिती तंत्रज्ञान (बीएससी आयटी) संगणकशास्त्र्ा (बीसीए) तसेच बारावीनंतर आयटीआय केलेल्या विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्यावर्षाला थेट प्रवेश मिळतो. हे प्रवेश देण्यासाठी शिक्षण संस्थांना 20 टक्के प्रवेश मर्यादा देण्यात आली होती. पण तंत्रशिक्षण परिषदेने यात घट करून हे प्रमाण 10 टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे गुणवत्ता असूनही विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळणे कठीण होणार आहे. पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना या नियमाची माहिती मिळणे गरजेचे होते, असे विद्यार्थी-पालकांचे म्हणणे आहे. काही पालकांनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.