शैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी अनोखे आंदोलन, विद्यार्थ्यांचे तापी नदीला साकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । धुळे

शिंदखेडा तालुक्यातील तापी नदी काठावरील साहूर ते दोंडाईचा रस्ता रुंद करीत रस्ता दुरुस्त व्हावा आणि शाळेच्या पहिल्या दिवसापासून महामंडळाची बससेवा मिळावी. दुष्काळ जाहीर करून शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्यकर्त्यांना सुबुद्धी प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करीत साहूर परिसरातील शाळकरी मुलांनी तापी नदीला साकडे घातले. तापी नदीला साजशृंगार साहित्यासह साडीचोळीचा आहेर बहाल केला. बालदिनाच्या दिवशी केलेल्या या आंदोलनाची दखल शासकीय यंत्रणा घेईल अशी अपेक्षा शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य, उपजिल्हाप्रमुख शाना सोनवणे यांनी व्यक्त केली.

शाना सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शालेय विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी तापी नदीला साडी, टिकली, बागडी अशा शृंगार साहित्यासह आहेर दिला. तत्पुर्वी साहूर गावात मिरवणूक काढली. विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. तापी माता शासनाला सुबुद्धी दे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होऊ दे, साहूर ते दोंडाईचा बसफेरी सुरू होऊ दे, शेतमालाला हमीभाव मिळू दे, शालेय शिष्यवृत्ती तत्काळ मिळू दे, टोकरे कोळी जमातीचे दाखले मिळू दे, अशी प्रार्थना करीत तापी नदीला शालेय विद्यार्थी आणि गावकऱयांनी हात जोडून याचना केली. तापी माता महापुरापासून आमच्या साहूर गावाचे व परिसरातील नागरिकांच्या जिवाचे रक्षण करण्यासाठी साडी, टिकली, बांगडीचा आहेर केला आहे. परंतु आज आमच्या शालेय शिक्षणाचेदेखील नुकसान होत आहे. साहूर ते दोंडाईचा पायी जाऊन शासन दरबारी निवेदन देत व्यथा मांडल्या.

शिंदखेडा तालुका दुष्काळी जाहीर झाला. दुष्काळामुळे शासनाने विद्यार्थ्यांना मोफत पासेसची घोषणाही केली. पण साहूर, शेंदवाडे, झोटवाडे, मंदाणे, दाऊळ या परिसरांत परिवहन महामंडळाची बसच नाही. मग योजनेचा या गावांना काय फायदा, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. तापी माता शासनाला व शासकीय अधिकाऱ्यांना सुबुद्धी दे अशी प्रार्थना करीत साऱ्यांनी तापी नदीच्या पात्रात उभे राहून विनंती केली. या वेळी उपजिल्हाप्रमुख शाना सोनवणे यांच्या सोबत बाबू न्हावी, पोलीस पाटील मोहन सोनवणे, उपसरपंच नाना सोनवणे, रघुनाथ सोनवणे, राजधर सदाराव, कुणाल माळी, दिगंबर माळी, संजय मगरे, सुकदेव सदाराव, गोरख सदाराव, प्रवीण ठाकरे, अनिल शिरसाठ, विठ्ठल वाकडे, संजय निकुम, महेंद्र कोळी, भूषण सोनवणे, विक्की कोळी, योगेश सोनवणे, सोनू कोळी, विलास ईशी, मधुकर कुवर, सोमा कोळी यांच्यासह विद्यार्थी गणराज सोनवणे, तनू सोनवणे, दिव्या सोनवणे, भूमिका कोळी, जयश्री कोळी, नंदिनी कोळी, सीमा कोळी, लीलाधर कोळी, गौरव कोळी, अर्चना कोळी, रोहिनी कोळी, चेतन वाघ, कुणाल कोळी, प्रतीक्षा कोळी, रूपेश कोळी, सुनील निकुम, दिव्येश कोळी, संध्या कोळी, दीपिका कोळी तसेच महिला शोभाबाई सोनवणे, खटाबाई सावळे, अनिताबाई सोनवणे, कीर्ती सोनवणे यांच्यासह अनेक विद्यार्थी आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.