ऑनलाइन शाळांना हवी दिवाळीची सुट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या सहा महिन्यांपासून दीर्घ सुट्टीच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना आता दिवाळी सुट्टीचे वेध लागले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत सलग शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी अनुभवता आली नाही. गणपतीच्या सुट्टीविषयीही शाळांना सूचना मिळाली नव्हती. त्यामुळे 1 नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी जाहीर करण्याची मागणी पालक व शिक्षकांकडून होत आहे.

सहामाही परीक्षा सुट्टीनंतर घ्या
अनेक शाळांनी ऑनलाईन प्रथम सत्र परीक्षेचे (सहामाही) वेळापत्रक जाहीर केले आहे. पालकांनी याबाबत शिक्षकांकडे विचारणा केली असून सहामाही परीक्षा दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्यावर घेण्यात यावी, अशी मागणी केली असल्याचे शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले.

शालेय शिक्षण विभागाकडून दरवर्षी एप्रिल महिन्यात आगामी शैक्षणिक वर्षाचे नियोजन जाहीर केले जाते. परंतु यावेळी कोरोनामुळे अशा प्रकारचे कोणतेही परिपत्रक न निघाल्यामुळे सुट्ट्यांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने शिकवणे सुरू असून आता विद्यार्थी व शिक्षक त्याला कंटाळले आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होऊ लागली असून ऑनलाईन वर्गात उपस्थित राहूनही अभ्यासाकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होऊ लागले आहे, असे ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनचे प्रा. मुक़ुंद आंधळकर यांनी सांगितले.