
पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व विचारात घेता नागरिकांमध्ये तृणधान्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
उपक्रमा अंतर्गत 1 ते 14 ऑगस्ट या कालावधीत कृषी विभागातील अधिकाऱ्यांमार्फत विद्यार्थ्यांना तृणधान्य पिके, त्यांची पौष्टिकता, त्यांचे आहारातील समावेशाचे फायदे याबाबत माहिती दिली जाणार आहे. 15 ऑगस्ट रोजी प्रभात फेरीत याबाबत जनजागृती केली जाईल. 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या पोषण पंधरवडय़ात स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्यासाठी तृणधान्य आधारित पाककृती स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल.






























































