विद्यार्थ्यांनो, सोशल मीडियाचा गैरवापर करू नका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

विद्यार्थी काही दिवसांपासून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास येत असून , त्यांच्याकडे आलेल्या पोस्ट जशाच्या तशा फॉरवर्ड करताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी करावा. त्याचा गैरवापर करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केले.

क्रांतीचौक पोलीस ठाण्याच्या वतीने जातीय सलोखा कार्यक्रमानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता, ते बोलत होते. या कार्यक्रमास श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, राम मंदिराचे पुजारी राजू महाराज, माजी महापौर रशीद मामू, अशोक सायन्ना यादव, माजी नगरसेवक नासेर खान यांची उपस्थिती होती. पोलीस आयुक्त प्रसाद पुढे म्हणाले की, समाजात वावरत असताना पोलीस आपले मित्र म्हणून काम करीत असतात. परंतु एखाद्याने कायदा हातात घेतल्यावर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांची भूमिका बदलते, असे त्यांनी यावेळी सांगितले.