
सामना प्रतिनिधी । मालवण
शालेय व महाविद्यालयीन जीवनात मिळालेल्या यशाचा आनंद करत बसण्यापेक्षा अधिकाधिक यश मिळवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे. शिवसेना सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून परिस्थितीमुळे कोणीही विध्यार्थी मागे राहणार नाही ही जबाबदार आमची आहे. असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी मालवण येथे बोलताना केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक व मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे आयोजित दहावी व बारावी परीक्षेतील तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शनिवारी मामा वरेरकर नाट्यगृह येथे पार पडला. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख जानव्ही सावंत, जिल्हापरिषद सदस्य हरी खोबरेकर, तालुकाप्रमुख बबन शिंदे, शहर प्रमुख बाबी जोगी, युवा सेना तालुका प्रमुख मंदार गावडे, अमित भोगले, नगरसेवक नितीन वाळके, पंकज सादये, तृप्ती मयेकर, किरण वाळके, तपस्वी मयेकर, गणेश गावकर, संमेश परब, विनायक परब, बाबा आंगणे, गोपी पालव, किसन मांजरेकर, अंजना सामंत, दीपा शिंदे व अन्य उपस्थित होते.
दहावी व बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मालवण तालुक्यातील सर्व शाळातील विद्यार्थ्यांचा तसेच पालक व शिक्षक वर्गाचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना ग्रामीण भागातील मुले अगदी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवत असल्याचा विशेष आनंद होत असल्याचे सांगितले.
बाळासाहेबांची कौतुकाची थाप आजही आठवते
२००९ मालवण-कुडाळ मतदार संघात विधानसभा निवडणुकीत मी कडवी झुंज दिली मात्र माझा पराभव झाला. त्यानंतर मला मातोश्रीवरून बाळासाहेब ठाकरे यांचा फोन करून बोलावले. माझ्या पाठीवर कौतुकाची थाप देत प्रोत्साहन दिले. हीच कौतुकाची थाप २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रेरणा देत विजयी करणारी ठरली. असे सांगत आमदार वैभव नाईक यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.































































