शाळा गाठण्यासाठी विद्यार्थांची चार किलोमीटर फरफट, वाड्याच्या निशेत रस्त्याला भगदाड; एसटी सेवा ठप्प

वाडा तालुक्यातील निशेत या पाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर भगदाड पडल्याने गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावरील एसटी सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चार किलोमीटर पायपीट करून शाळा गाठावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभामुळे विद्यार्थ्यांवर ही वेळ आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करून बससेवा सुरू करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

कळंभे ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या निशेत, ठाकूर पाडा या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी बससेवा होती. याच बसमधून विद्यार्थी शाळेत जायचे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे निशेत रस्त्यावर भल ामोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे या मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान, कळंभे येथील शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना चार किलोमीटरची पायपीट करावी लागते. पावसापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती केल्याने रस्त्यावर खड्डा पडला आहे.

रस्त्याची दुरुस्ती व्हावी याबाबत ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार दिली आहे. पाऊस असल्यामुळे दुरुस्ती करण्यात येणार नाही. पाऊस जाताच रस्ता दुरुस्त करण्यात येईल असे आश्वासन बांधकाम विभागाने दिले आहे.

पांडुरंग पटारे, उपसरपंच, कळंभे ग्रामपंचायत