विद्यार्थिनीची तब्येत बिघडली, रुग्णालयातून दिला पेपर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकोल्यातली मूर्तिजापूर शहरात परीक्षा केंद्रावर गेलेल्या एका विद्यार्थिनीला अचानक भोवळ आली, मात्र तरीही तिने जिद्द सोडली नाही. तिने चक्क रुग्णालयातून पेपर दिला.

श्रेया देशमुख असे विद्यार्थिनीचे नाव आहे. ती गणिताचा पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोचली होती.  मात्र अचानक तिची प्रकृती बिघडली. तिला चक्कर आली. या घटनेनंतर विद्यालय प्रशासनाने तत्काळ तिला जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिने आपला गणिताचा पेपर पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली. श्रेयाची पेपर द्यायची इच्छा होती. विद्यालय प्रशासनाने तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली व विशेष परवानगी मिळवली.

नियोजित वेळेत पेपर केला पूर्ण

डॉक्टरांनी तपासणी करून श्रेयाची प्रकृती समाधानकारक असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आवश्यक वैद्यकीय देखरेखीखाली श्रेयाने थेट रुग्णालयातूनच गणिताचा पेपर पूर्ण केला. संपूर्ण प्रक्रिया सुरू असताना महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासनाच्या या माणुसकीपूर्ण आणि संवेदशनशील भूमिकेमुळे श्रेयाने नियोजित वेळेत आपला पेपर पूर्ण केला.