Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम

देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्लास्टिकचा कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाणार आहेत. या स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सृजन सायन्स सेंटर देवरुख तर्फे करण्यात आले आहे.

प्लास्टिकमुक्त शहर स्वच्छतेचा ध्यास या युक्तीप्रमाणे ही स्पर्धा होणार आहे. प्लास्टिकमुळे वाढणारे प्रदूषण कमी करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पुनर्वापर व पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करणे यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्पर्धकांनी त्यांच्या परिसरातील रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक कचरा व रॅपर्स गोळा करायचे आहेत. हे सर्व प्लास्टिक प्रत्येक रिकाम्या बाटलीत भरायचे आहे. या भरलेल्या बाटल्या सृजन सायन्स सेंटरमध्ये जमा करायच्या आहेत.

ज्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक प्लास्टिक संकलन केले असेल त्या पहिल्या २५ विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक सहभागी स्पर्धकालाही बक्षिसे देण्यात येतील. जमवलेल्या प्लास्टिकपासून उपयुक्त वस्तू बनविण्यात येणार आहेत. हा उपक्रम सायन्स सेंटरमध्येच राबवला जाणार आहे. यासाठी सर्व प्लास्टिक १ नोव्हेंबर रोजी स्थळ सृजन सायन्स सेंटर देवरुख येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेतच जमा करावयाचे आहे. या अनोख्या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे.