
कार अपघाताचा सीन करत असताना स्टंटमनचा सेटवरच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. स्टंटमनच्या मृत्यूमुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दाक्षिणात्य चित्रपट ‘वेट्टूवम’ च्या चित्रीकरणादरम्यान हा अपघात घडला. एस.एम. राजू असे मयत स्टंटमनचे नाव आहे.
राजू यांनी अनेक दाक्षिणात्य सिनेमांत स्टंटमन म्हणून काम केले होते. दिग्दर्शक पा. रंजित यांच्या वेट्टूवम या चित्रपटाचे नागपट्टिनम येथे रविवारी शूटिंग सुरू होते. सेटवर कार अपघाताचा सीन शूट करत असताना दुर्घटना घडली आणि राजू यांचा मृत्यू झाला. या स्टंटचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दाक्षिणात्य अभिनेता विशालने सोशल मीडियावर राजूच्या निधनाची पुष्टी करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजू यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आश्वासन विशालने दिले.