
धावत्या लोकलमधून पडून एका पोलीस उपनिरीक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कळवा रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर घडली. मनोज भोसले (57) असे त्या उपनिरीक्षकाचे नाव होते. ते पवई पोलीस ठाण्यात कार्यरत होते. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शुक्रवारी दिवसपाळी राखीव कर्तव्य पार पाडून संध्याकाळी सात वाजता भोसले घरी निघाले. त्यानंतर तेथून ते कल्याणला गेले. कल्याणहून कळव्याला येत असताना रात्री सवा नऊ वाजण्याच्या सुमारास कळवा स्थानकापासून काही अंतरावर ते धावत्या लोकलमधून खाली पडले. याबाबत माहिती मिळताच ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. लोकलमधून पडलेल्या व्यक्तीच्या पाकिटात मनोज भोसले या नावाचे मुंबई पोलीसचे ओळखपत्र मिळाले. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली.





























































