गोरेगावकरांची होणार वाहतूककोंडीतून सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

वर्षानुवर्षे वाहतूककोंडीचा सामना करणाऱ्या गोरेगावकरांची अखेर वाहतूककोंडीच्या जाचातून सुटका होणार आहे. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे गोरेगाव पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱया वीर सावरकर उड्डाण पुलाच्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याची आज शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पाहणी केली. हा विस्तारित उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर लिंक रोडवर जाणाऱ्या वाहनांची एस. व्ही. रोड जंक्शनवर होणारी वाहतूककोंडी फुटणार असून इनऑर्बिट मॉलच्या दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांचा वेळ अर्ध्या तासाने वाचणार आहे.

गोरेगाव परिसरात वाढणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी २००४ मध्ये सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून सावरकर पुलाचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सुमारे ४५८ मीटर लांब आणि ११.५० मीटर रुंद असलेल्या या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याची आज देसाई यांनी पाहणी केली. यावेळी या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या दोन-तीन दिवसांत काम पूर्ण झाल्यावर उद्घाटनाची तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती पालिका अधिकाऱयांनी दिली. याप्रसंगी विभागप्रमुख आमदार सुनील प्रभू, पालिकेच्या स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) साधना माने, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर, उपविभागप्रमुख शशांक कामत, दीपक सुर्वे, माजी नगरसेवक दिलीप शिंदे, राजू पाध्ये उपस्थित होते.

शिवसेनेच्या प्रयत्नांमुळेच सावरकर उड्डाणपूल
गोरेगाव येथील एस. व्ही. रोडवर होणारी वाहतूककोंडी कमी करण्यासाठी सुभाष देसाई यांच्या प्रयत्नामुळेच २००० साली वीर सावरकर उड्डाणपूल बांधण्यात आल्याचे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितले. त्यानंतरही येथील वाहनांची संख्या वाढत असल्याने पुलाच्या विस्तारीकरणासाठी देसाई यांनीच सातत्याने पाठपुरावा केला. पालिका अधिकाऱयांबरोबर वेळोवेळी बैठका घेतल्यानेच हा प्रश्न मार्गी लागल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले.