
अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनानंतर अभिनेता सुबोध भावे याने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. प्रिया ही सुबोधची चुलत बहीण होती. ‘‘माझी बहीण लढवय्या होती, पण अखेर तिची ताकद कमी पडली,’’ अशा शब्दांत सुबोधने भावना व्यक्त केल्या आहेत.
पोस्टमध्ये सुबोध म्हणाला, प्रिया मराठे ही उत्तम अभिनेत्री, काही मालिका आणि चित्रपटांत माझी सहकलाकार. पण माझ्यासाठी त्याहीपेक्षा महत्त्वाचे नाते तिच्या बरोबर होते. प्रिया माझी चुलत बहीण… या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहनत, कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूप काwतुकास्पद होत्या. प्रत्येक भूमिका तिने मनापासून साकारली. काही वर्षांपूर्वी तिला पॅन्सरचे निदान झाले. त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली. नाटक, मालिका यामधून पुन्हा आपल्या सहजसुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली. पण त्या पॅन्सरने काही तिची पाठ सोडली नाही. ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला. या प्रवासात तिचा जोडीदार शंतनू मोघे भक्कमपणे तिच्याबरोबर होता. माझी बहीण लढवय्या होती, पण अखेर तिची ताकद कमी पडली, असे सुबोध म्हणाला.
मला खूप वाईट वाटलं. मी अंकिताला भेटले तेव्हा आम्ही ठरवलं होतं की, तिला भेटायला जायचं. पण अंकिता मला म्हणाली, शंतनू म्हणतो, येऊ नका. तिला भेटण्यासारखी परिस्थिती नाही. तरीदेखील मी म्हटलं तिला भेटायला जाऊया. पण वाटलं नव्हतं, ती इतक्या लवकर आमच्यातून जाईल. देव का असं करतो, मला काही कळत नाही. त्या पोरीने आताच संसार उभा केला होता.
– उषा नाडकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री
आम्ही ‘एकापेक्षा एक’ आणि अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र काम केले होते. प्रिया ही एक गुणी, शांत, नम्र आणि सोज्वळ मुलगी होती. ती आपल्या कामाशी काम ठेवायची. तिच्या कामावर तिचे नितांत प्रेम होते. ती कोणाला उलट उत्तरही द्यायची नाही. देव अशी चांगली माणसं का नेतो, असा प्रश्न मला पडला आहे.
– प्राजक्ता माळी, अभिनेत्री