ज्ञानपीठाच्या पिठात किडे वळवळतायत? सुधाकर गायधनी यांची टीका

346

सामना प्रतिनिधी, नागपूर

आपली साहित्यकृती ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराच्या लायकीची होती. तरीही लायकी नसताना भालचंद्र नेमाडे यांच्या पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला. अलीकडे पुरस्कारही मॅनेज होत असून ज्ञानपीठाच्या पिठात आता किडे वळवळताहेत, अशी गंभीर टीका ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांनी केली. ‘कब्रीतला समाधिस्थ’ या आपल्या पुस्तकाच्या दुसऱया आवृत्तीच्या प्रकाशन सोहळय़ाप्रसंगी बोलताना त्यांनी भावना व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना गायधनी पुढे म्हणाले, सामान्य कलाकृतीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळत असेल तर काय म्हणावे! आम्ही कवी फकीर वृत्तीचे आहोत. आत्मसन्मानाला नख लागू देत नाही. आपण आयुष्यभर हे व्रत जोपासले आहे. 46 वर्षांनंतर त्यांच्या या पुस्तकाच्या दुसऱया आवृत्तीचे प्रकाशन पार पडले. 1973 मध्ये या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभाची आठवण त्यांनी करून दिली. कवीला इगो असावाच, मात्र तो सुंदर असावा, तोच कवीला प्रेरित करीत असतो. इगो सुंदर असेल तर ताजमहाल बनतो, अन्यथा बीबी का मकबरा बनतो. नवकवितेचा काळ आला तेव्हा अनेकांनी नाक मुरडले. मात्र त्यातूनच आठ खंडांचे आणि 260 पृष्ठांचे ‘योगिनींच्या स्वप्नसावल्या’ महाकाव्य जन्मास आले, असे गायधनी म्हणाले.

नेमाडेंवर टीका
‘ज्ञानपीठ’ कुणालाही मिळतो. भालचंद्र नेमाडे यांच्या सुमार कादंबरीलाही तो मिळतो अशी टीका करून गायधनी म्हणाले, ‘पद्मश्री’ गल्लीतील कोणालाही मिळतो. मलाही विचारणा झाली होता, पण मी ‘पद्मभूषण’ मागितले. अनेकजण स्वतःला नामवंत कवी समजतात. पण कविता काय असते ते त्यांनाही कळत नाही. ती कविता विस्मृतीत जाते आणि कवी स्वर्गात जातो, असेही गायधनी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या