
पायाचा टाचांना भेगा पडण्याच्या समस्येचा सामना हल्ली बऱ्याच जणांना करावा लागतो, मात्र हा त्रास काही वेळा एवढा वाढतो की, त्यामुळे टाचा दुखतात, त्यातून रक्त येते. हिवाळ्यात तर या त्रासाचे प्रमाण वाढते. काही जणांना तर वर्षभर टाचांना पडलेल्या भेगांचा त्रास सहन करावा लागतो. यामागे शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता हे कारण असू शकते. पाहूया शरीरात कोणत्या जीवनसत्त्वांची कमतरता असल्यास पायाच्या टाचांना भेगा पडू शकतात.
त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी जीवनसत्त्व सी, ई आणि बी 3 महत्त्वाचे मानले जाते. शरीरात या जीवनसत्त्वांची कमतरता असल्यास टाचांना भेगा पडण्याची समस्या भेडसावते. बहुतेकांना हे माहित नसते की, कोणत्या जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास भेगा पडू शकतात. त्यामुळे हिवाळ्याव्यतिरिक्त इतर वेळी पायाच्या टाचांना भेगा पडत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधून या तीन जीवनसत्त्वांची कमतरता जाणून घेणे आवश्यक आहे.
जीवनसत्त्व बी 3 त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते. शरीरात जीवनसत्त्व बी 3ची कमतरता असेल तर त्वचेला खाज येणे, स्मरणशक्ती कमी होणे, डायरिया हे आजार होऊ शकतात. बऱ्याचदा बी3च्या कमतरतेमुळे मान, हात, पाय अशा शरीराच्या उघड्या अवयवांवर खाज येण्याची शक्यता असते.
जीवनसत्त्व सी च्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे, रक्ताभिसरणात अडथळे येथे असे त्रास होतात. तसेच जखमा लवकर भरून न निघणे, केसांच्या मुळांशी रक्तस्त्राव होणे, हिरड्यांमधून रक्त येणे, केसगळती, थकवा आणि अॅनिमिया ही लक्षणे शरीरात जाणवू लागतात.
त्याचप्रमाणे शरीरात ई हे जीवनसत्त्व ब्यूटी विटॅमिनचे एक रूप मानले जाते. त्वचा आणि केसांकरिता हे जीवनसत्त्व अतिशय आवश्यक आहे. शरीरात या जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास अशक्तपणा, त्वचा कोरडी होणे, शरीरावर सुरकुत्या दिसणे, अकाली वृद्धत्व येणे असे त्रास होऊ शकतात.
पायांच्या सौंदर्याकरिता
पायांच्या टाचांना भेगा पडणे हे त्वचा कोरडी असण्याचे एक लक्षण असू शकते. या समस्येपासून सुटका होण्यासाठी भेगांना मॉइश्चरायझर लावावे तसेच भेगाकडील त्वचा हायड्रेट राहील याकडे लक्ष द्यावे. पाणी भरपूर प्यावे. पायांच्या भेगा स्वच्छ ठेवाव्यात. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवावेत. त्यानंतर पायांना मॉइश्चरायझर लावावे. याकरिता क्रॅक हिल्स क्रीमचा वापर करू शकता.

























































