
अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रासह कर्नाटकात आलेल्या पुरामुळे उसाचे क्षेत्र घटल्याने साखर उत्पादन अर्ध्यावर येणार आहे. याचा थेट परिणाम देशातील साखरेच्या एकूण उत्पादनावर होणार आहे. मागील वर्षी 360 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले होते. त्यामध्ये येत्या गळीत हंगामात 80 लाख मेट्रिक टनाची घट होऊन 282 लाख मेट्रिक टनापर्यंत खाली येणार आहे. त्यामुळे 2020 मध्ये किरकोळ बाजारातील प्रतिकिलो साखरेचा दर 45 रुपयांवर जाईल असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केला आहे. त्यामुळे साखर सर्वसामान्यांसाठी कडू ठरणार आहे.
इथेनॉलचाही साखर उत्पादनावर परिणाम
सध्या केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिक्स करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे ऑइल कंपन्यांकडून साखर कारखान्यांकडून तयार केल्या जाणाऱया इथेनॉलला मोठी मागणी आहे. तसेच साखरेच्या तुलनेत चांगला दर मिळत आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून अनेक कारखाने उसाच्या रसापासून मोठय़ा प्रमाणात इथेनॉलचे उत्पादन करत आहेत. त्याचाही परिणाम साखर उत्पादनावर होणार आहे.





























































