बोरगव्हाण येथे पाच एकर ऊस जळून खाक, 7 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 सामना प्रतिनिधी । पाथरी  

तालुक्यातील बोरगव्हाण येथील २ शेतकर्‍यांचे मिळून एकूण ५ एकर ऊसाचे उभे पीक आगीत जळून आज खाक झाले. ही घटना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. यापैकी एका शेतकर्‍याला आपल्या डोळ्या देखत जळत असलेला ऊस पाहुन जागेवच भोवळ आल्याने त्यांना पाथरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पाथरी नगर पालिकेने अग्निशमन दलाची गाडी पाढवून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ग्रावकर्‍यांच्या सतर्कमुळे पुढील होणारा अनर्थ टळला.

तालुक्यातील इंगळे बोरगव्हाण येथील शेतात लागलेल्या अचानक आगीत शेतकरी बाळासाहेब कारभारी इंगळे यांचा तीन एकर तर बाबासाहेब ज्ञानोबा इंगळे यांचा दोन एकर ऊस असा एकूण ५ एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये दोघांचे मिळून अंदाजे ७ लाखांचे नुकसान झाले आहे. अस्मानी संकटांना तोंड देऊन शेतकरी जेमतेम पीक जोपाण्यासाठी तारेवरची कसरत करत आहे. जीवाचे रान करून व रक्ताचे पाणी घालून तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेला ऊस काही दिवसातच गाळपास जाईल व आपल्या कुटुंबाची रंगवलेली स्वप्ने पूर्ण होतील, या आशेने येथील शेतकरी ऊसा या पीकाकडे पाहत आहेत. परंतु येथील शेतकरी बाळासाहेब व बाबासाहेब इंगळे हे शेतात ऊस पीकाला आग लागल्याचे समजातच गावातील नागरिकांसह शेतात धावत आले. त्यावेळी बाळासाहेब यांना आपल्या उभ्या ऊस पीकाला लागलेली आग पाहून मनात एकच धडकी भरली व ते जागेवरच भोवळ येऊन पडले. यानंतर त्यांना तात्काळ पाथरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अचानक लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु ऊस पीकांवरून गेलेल्या विद्युत तारांमुळे आग लागली असावी, असा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. या पीकाच्या बाजुला आणखी ऊस पीकाचे क्षेत्र असल्याने गावकर्‍यांनी धावाधाव करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यातच पाथरी नगर पालिकेने अग्निशमन दलाची गाडी पाढवून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. गावकर्‍यांच्या सतर्कमुळे पुढील होणारा अनर्थ टळला.