पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड मजुरांचे स्थलांतर सुरू

498

आष्टी तालुका कमी पर्जन्य छायेत येत असल्याने जेमतेम पाऊस पडतो आणि शाश्वत शेती नसल्याने ऊसतोडणी मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते यावर्षी जुनपासुनच पावसाने हुलकावणी दिली होती यामुळे खरिपाची पिके म्हणावा तसे आले नव्हते. परंतु परतीचा पाऊस ऑक्टोबर महिन्यात पडल्याने आलेली पिके हातातुन गेली आहेत.पाणी साठा उपलब्ध नसल्याने रब्बी हंगामातील पिकांचा भरवसा राहिला नाही. म्हणुन यावर्षी ऊसतोडणी मजुरांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका हा दुष्काळी म्हणुन ओळखला जातो .या तालुक्यातील जमिनी खडकाळ आहेत . नगर जिल्हा आणि तालुक्याच्या सरहद्दीवरून वाहणाऱ्या सिना व्यतिरिक्त मोठी नदी नाही.पाणीसाठवण्यासाठी मोठे धरणे नाहीत, अल्पभूधारक शेतकऱ्याचे प्रमाण जास्त आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाना शेतीवर संसाराचा गाडा चालवणे शक्य नसल्याने लहान मुला बाळांसह पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडणीसाठी इतरत्र जावे लागते. गत वर्षे दुष्काळात गेल्याने ऊसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. ऊस गाळपाला ऑक्टोबर मध्ये सुरुवात होत असते परंतु यावर्षी डिसेंबर महिना उजेडला असताना गाळप सुरू झाली नाही. ऊसाचे क्षेत्र घटल्याने साखर कारखाने दोन ते तीन महिने चालतील असे बोलले जात आहे.

शेतामध्ये पिकलेले खायला पुरत नाही. राजकारणात अग्रेसर असणारा जिल्हा विकास कामात मागासलेला आहे. आमच्या वडिलांनी पण आयुष्यभर ऊस तोडला असुन आता आमच्या पोरांना सुद्धा ऊस तोडावा लागत आहे. गेल्या वर्षी दुष्काळात गेले मागच्या वर्षी घेतलेली उचल फिटली नसल्याने चालु वर्षी मागच्याच बाकी मध्ये ऊस तोडावा लागत आहे. भल्यापहाटे उठून थंडीच्या दिवसात लहान मुला बाळांसह ऊसाच्या फडात जावे लागते. – विष्णु गिते , ऊसतोड मजुर

तालुक्यातील धरणे कोरडेठाक

आष्टी तालुक्यातील जून पासून पावसाने हुलकावणी दिली. परतीच्या पावसाने निराशा केली असल्याने तालुक्यातील ६ मध्यम प्रकल्प ,१४ लघुमध्यम तलाव आजही कोरडेठाक आहेत.नद्या नाले ही कोरडे असल्याने या वर्षीही पाणी प्रश्न गंभीर भेडसावणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या