कळवण – ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित उसखरेदी रक्कम देण्याची आग्रही मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कळवण

कळवण, देवळा, सटाणा व मालेगाव कार्यक्षेत्र असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला सण 2018-19 काळात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचे ऊस पेमेंट तत्काळ अदा करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी प्रभाकर पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर शासन नियुक्त प्राधिकृत मंडळ नियुक्त करण्यात आले होते. मात्र सण 2016-17 या काळात कारखाना बॉयलर पुजन करूनही बंद राहिला असल्याने कारखान्याचे ऊस उत्पादक, कामगार यांचे मोठे मोठे नुकसान झाले होते. हा कारखाना 2018-19 या काळात उस्मानाबाद येथील धाराशिव साखर कारखाना युनीट -1 चे अध्यक्ष अभिजित पाटील यांना भाडेतत्वावर करार चालविण्यास दिला आहे. चालू हंगामाच्या गव्हाण पूजनावेळी डॉ. राहुल आहेर यांनी कादवा व द्वारकाधीश साखर कारखाने जो भाव देतील त्यापेक्षा 1 रुपया जास्त भाव देऊ असे आश्वासन दिले होते.

मात्र कारखान्याकडून काही शेतकऱ्यांना २ हजार आगाऊ रक्कम दिली तर काहीना पैसेच केले नाही. बहुतांशी शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आले आहेत. मात्र कारखान्याच्या खात्यात शिल्लक रक्कम नसल्याने धनादेश वटले नाहीत. म्हणून कार्यक्षेत्रातील शेतकरी हैराण झाले आहेत. त्यात कारखाना चालविणारा करारधारक बेपत्ता झाला असल्याने शेतकऱ्यांच्या संकटात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणविणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी शेतकऱ्यांचे देणे देण्यास जबाबदार असणाऱ्याना शासकीय यंत्रणेमार्फत शोधून शेतकऱ्यांच्या घामाचे दाम अदा करण्यास भाग पाडावे, अशी मागणी निवेदनाद्वारे ऊस उत्पादक शेतकरी प्रभाकर पाटील यांनी केली आहे.