पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड कामगार दोन दिवसापासून उन्हात

645

पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यातील साखर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी गेलेले मजूर आपापल्या गावी परतत असताना सौताडा तालुका पाटोदा येथील चेक पोस्टवर पोलिसांनी अडविल्याने या 200 मजुरांवर लहान मुलाबाळांसह सौताडाच्या माळावर भर उन्हात थांबण्याची वेळ आली आहे. एकीकडे कोरोनाची भीती सर्वांनाच असली तरी या मजुरांचे व त्यांच्या लेकरांचे हाल होत आहेत

राज्यातील साखर कारखान्यांना ऊस तोडणी मजुरांचा पुरवठा करणाऱ्या पाटोदा तालुक्याची ‘ऊस तोडणी मजुरांचा तालुका’ अशी ओळख राज्यभर आहे. कोरोनास प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात जिल्हा प्रशासनाने 28 मार्च रोजी बीड जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत.

राज्यभरातील साखर कारखान्यावरील मजूर कोरोनाच्या भीतीने आपल्या गावी परतू लागले आहेत. पाटोदा तालुक्यातील सौताडा येथून बीड जिल्ह्याची हद्द सुरू होते.त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक अफरोज पठाण यांच्यासह 20 पोलिसांचे पथक सौताडा चेक पोस्टवर कार्यरतआहे. जालना,मंठा,गेवराई ,लातूर भागातील व जरांडेश्वर,भुईज,सोमेश्वर या साखर कारखान्यावरील ऊस तोडणी मजूर 30 मार्च रोजी गावाकडे परतत असताना सौताडा येथील चेक पोस्टवर पोलिसांनी अडविले. ट्रक व ट्रॅक्टर मधून गावाकडे निघालेले मजूर वाहनांसहीत अडविल्याने या मजुरांची खाण्यापिण्याची,राहण्याची वाईट अवस्था झाली आहे. सौताडा माळावर भर उन्हात लेकराबाळांसह बसण्याची वेळ या मजुरांवर आली आहे.

सौताडा येथील पत्रकार संजय सानप यांनी व सहकारी यांनी मंगळवारी सकाळी या मजुरांची भेट घेतली. संजय सानप यांनी व सहकाऱ्यांनी मिळून या मजुरांच्या पिण्याच्या पाण्याची व जेवणाची व्यवस्था केली. साई दर्शन सेवा भावी संस्था पाटोदा यांच्याकडून सौतडा येथे जाऊन 200 ऊसतोड मजूरांना किराणा समान वाटप करण्यात आले. यावेळी साई दर्शन सेवा भावी संस्थेचे दर्शन कांकरिया व सहकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या