
सामना प्रतिनिधी । बीड
महागाई निर्देशांकानुसार ऊस तोडणी मजूरांच्या मजुरीमध्ये शंभर टक्के वाढ करावी तसेच मुकदम यांचे कमिशन ३५ टक्के करावेत यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील ऊस तोडणी मजूर मुकादम यांनी ऑगस्टपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. सरकारला साखर कारखाने सुरू करायचे असल्यास आधी मागण्या मंजूर कराव्यात नसता कोयता हातात घेतला जाणार नाही असा गंभीर इशारा गोपीनाथराव मुंडे साहेब ऊस तोडणी मजूर, मुकादम व वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. तसेच या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले
गोपीनाथराव मुंडे साहेब ऊस तोडणी मजूर मुकादम व वाहतूकदार संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेची 20 ऑगस्ट रोजी बीड शहरातील शासकीय विश्रामगृह होते पत्रकार परिषद घेऊन राज्यव्यापी संप घोषणा करण्यात आली. या पत्रकार परिषदेस संघटनेचे अध्यक्ष श्रीमंतराव जायभाय, मार्गदर्शक माजी आमदार केशवराव आंधळे, आदी उपस्थित होते.
संघटनेचे मार्गदर्शक माजी आमदार आंधळे म्हणाले, ऊसतोडणीच्या दरवाढीसंदर्भातचा करार संपुष्टात आलेला आहे. त्या अनुषंगाने ऊसतोडणी मजूर, मुकादम आणि वाहतूकदार यांची ३१ जुलै २०१८ रोजी मांजरसुंबाभा (ता. बीड ) येथे ऊस तोडणी संघटनेची बैठक झाली. २०१८-२०१९ या हंगामात ऊस मोठ्या प्रमाणावर असल्याने साखर कारखाने लवकर सुरू करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. मात्र, मजूर मुकादम आणि वाहतूकदार यांचा विचारही सरकार मधून केलेला दिसून येत नाही. परिणामी गोपीनाथराव मुंडे साहेब ऊस तोडणी मजूर, मुकादम व वाहतूकदार संघटनेचे द्वारे राज्यभरामध्ये विविध बैठका घेऊन न्याय हक्कासाठी लढण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यामध्ये ३० लाखाहून अधिक ऊस तोडणी मजूर आहेत असा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे . त्यामुळे सरकारला मूलभूत प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. अन्यथा ऊस कारखान्यात जाऊ दिला जाणार नाही अशी भूमिकाही संघटनेकडून घेतली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत राज्य शासनाला दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
या आहेत प्रमुख मागण्या
२०१४-२०१५ करिता २० टक्के अंतरिम दरवाढ घोषित केली , त्याची अंमलबजावणी करावी. ऊस तोडणी दरात दुप्पट वाढ करावी. ऊस तोडणी मुकादमास साडे १८.५ टक्के कमिशन आहे ते ३५ टक्के करावे. कारखाना साइटवर ऊसतोड मजूर व मुकादमास पक्के निवास आणि सौचालय बांधून देण्यात यावेत. ट्रक व ट्रॅक्टरच्या वाहतुकीत वाढ करावी. ट्रॅक्टर गाडी तीस किलोमीटर पर्यंत बैलगाडीची तोडणी वाहतूक मिळावी. ऊस तोडणी मजुरांचा जीवन विमा कारखान्यामार्फत भरण्यात यावा. ऊस तोडणी मजुरांचा दारिद्र्यरेषे मध्ये समावेश करण्यात यावा. साठ वर्ष पुढील ऊसतोड मजूर आस आणि मुकादमास पेन्शन लागू करावी. बैलगाडीच्या टायर गाडी प्रतिदिन १५ रुपये देण्यात यावी व ट्रॅक्टर गाडीचे भाडे प्रतिदिन ३० रुपये देण्यात यावे. ऊस तोडणी मजुरांच्या मुलाकरिता प्रत्येक तालुक्यात निवासी शाळा आणि वसतिगृहाची सोय करावी यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.




























































