कोपरगाव : दोन दिवसांत चार आत्‍महत्‍या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

कोपरगाव तालुक्यात गेल्‍या दोन दिवसात वेगवेगळया कारणाने दोन तरूण व दोन महिलांनी आत्‍महत्‍या केली. आत्महत्या केलेले चारही जण १७ ते २७ वयोगटातील आहेत. या सर्व घटनांची पोलीसांत आकस्‍मात मृत्‍यूची नोंद आहे.

गुरूवारी सायंकाळी शहरातील संजयनगर भागात राहणाऱ्या अनिल गणेश कुऱ्हाडे (१९) या तरूणाने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तर शुक्रवारी संजय नगर भागात राहणाऱ्या लक्ष्मी लखन आल्हाट या १७ वर्षीय मुलीने दुपारी राहत्या घरातील पत्र्याच्या पाईपला गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. मृत लक्ष्मी हिचे नुकतेच लग्न ठरले होते. नैराश्यातून आत्महत्या केल्याची शक्यत व्यक् करण्यात आली आहे.

आत्महत्याची तिसरी घटना शहरातील शंकरनगर भागात घडली आहे. गुरूवारी सायंकाळी पुजा पुंडलीक शिरसाठ (२७) या विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. मयत पुजा शिरसाठ हिच्या आत्महत्या करण्यामागचे कारण समजु शकले नाही. पोलीसात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तर तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील अनिल अर्जुन पवार (२४) या तरूणाने पायाच्‍या आजाराला कंटाळुन गुरुवारी सकाळी झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.