पोलिसांच्या त्रासाला कंटाळून अपंग तरूणाची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । शिर्डी

शिर्डी येथून जवळच असलेल्या रूई गावातील एका अपंग तरुणाला दोघा तरूणांनी एका गुन्ह्यात गोवले व पोलिसांनी त्रास दिल्यामुळे त्याने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली.

महिनाभरापासून या प्रकारामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या या तरुणाच्या मुलीचे पंधरा दिवसांपूर्वी लग्न झाले. लग्नाच्या तयारीसाठीही तो बाहेर पडला नाही. लग्नातही गप्पच होता. त्यानंतर घरी कुणीही नसतांना त्यांनी काल गळफास घेवून जीवन संपविले. आत्महत्येपूर्वी त्याने पोलीस अधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहीली होती.

सुदेश प्रभाकर भारती (४४) असे या तरुणाचे नाव आहे. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी ही घटना उघडकीस आली. सुदेशचे कुटुंबिय बाहेरगावी गेलेले होते. तेव्हा त्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघड झाले. आत्महत्येपुर्वी सुदेशने पोलीस अधिक्षक ईशु सिंधु, अप्पर अधिक्षक रोहिदास पवार व उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या नावे चिठ्ठी लिहुन ठेवली आहे.

आप्पासाहेब बाबुराव शिरसागर,रहाणार- सावळेविहीर व अन्वर मन्सुर शेख, रहाणार – चांदेकसारे या दोघांनी आपल्याला चोरीच्या गुन्ह्यात गोवले. शिर्डी पोलीस स्टेशनचे कर्मचारी चव्हाण यांनी सुदेशची पत्नी अन्नपुर्णा यांच्याकडे चाळीस हजार रूपये दे, नाहीतर तुझ्या नवऱ्याला जेल मध्ये टाकतो, अशी धमकी दिल्याने पत्नीने उसणवार करून पैसे भरले, असे लिहून माझ्यावर अन्याय झाला आहे. अपंगांसाठी कायदा आहे. तो कायदा कुठे गेला? असा सवाल उपस्थीत करत कायदेशीर कारवाईची याचना सुदेशने चिठ्ठीत केली आहे.

सावळेविहीरच्या तरुणाला मोबाईल घ्यायचा होता. त्याला सुदेशने चांदेकसाऱ्याच्या तरुणाचे नाव सांगितले. त्यानुसार सावळेविहीरच्या तरुणाने मोबाईल घेतला. वास्तविक तो मोबाईल चोरीचा होता. ही गोष्ट सुदेशला माहीत नव्हती. पोलिसांनी पकडल्यावर सावळेविहीरच्या तरुणाने सुदेशचे नाव सांगितले. त्यानंतर नगरच्या गुन्हे अन्वेशन विभागाने त्याच्या कुटूंबाला काहीही माहिती न देता महिनाभरापूर्वी रात्री जेवतांना घरून उचलून नेले.

त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर आणखी गुन्हे दाखल करण्याची तसेच जेलमध्ये सडवण्याची धमकी देवून त्याच्या बायकोकडून पैसे उकळले. त्यामुळे तो मानसिकदृष्ठ्या खचला होता. एका हाताने अपंग असलेला सुदेश रिक्षा चालक होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक अविवाहीत मुलगी व लहान मुलगा आहे, असे माजी उपसरपंच फकीरा लोढा व सुदेशची सासु सुशिलाबाई गोसावी यांनी सांगितले.