
नोयडामध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाढदिवसाचा केक कापतानाचा क्षणभराचा आनंद दुःखात बदलला आहे. पत्नीच्या वाढदिवसानिमित्त आणलेला केक कापल्यानंतर नवरा-बायकोमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महिलेचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. पतीशी झालेल्या भांडणानंतर महिलेने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि तपासाला सुरुवात केली आहे. ही घटना नोयडातील सेक्टर 119 मधील एल्डिको आमंत्रण सोसायटीमधील आहे. या इमारतीत सोनम सिंह नावाची महिला पती उत्तम कुमार सोबत राहत होती. त्या दोघांना 10 वर्षांचा मुलगाही आहे. उत्तम कुमार इंजिनीअर आहे. सोनम यांचा शुक्रवारी वाढदिवस असल्याने गुरुवारी रात्री 12 वाजता वाढदिवसाचा केक कापायचे ठरले होते.
सोनम यांनी गुरुवारी रात्री 12 वाजता आनंदाने वाढदिवसाचा केक कापला. त्यानंतर काहीतरी कारणाने उत्तम कुमार आणि त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. काही वेळाने दोघेही शांत झाले आणि सोनम झोपण्यासाठी आपल्या खोलीत निघून गेल्या. शुक्रवारी बराच वेळ झाला तरी त्या खोलीतून बाहेर आल्या नाहीत. त्यामुळे उत्तम कुमार यांनी त्यांना आवाज दिला. तरीही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे उत्तम यांनी कसाबसा दरवाजा उघडला. त्यानंतर सोनम यांचा मृतदेह त्यांना पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.
उत्तम कुमार यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच पुढील तपास सुरू केला आहे. सोनम यांनी आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस उत्तम कुमार यांचा जबाब नोंदवत आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने आनंदात केक कापून झालेल्या एका भांडणाने सोनम यांनी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




























































