अंतराळाचे अंतरंग – जीवनासाठी प्रेरक – अशनी आघाती विवरे

>> सुजाता बाबर

खगोलशास्त्र हा मानवी कुतूहलाचा प्राचीन, परंतु सतत विस्तारत राहणारा प्रवास आहे. आकाशातील तारे, ग्रह, धूमकेतू, दीर्घिका, कृष्णविवरे यांचे रहस्य उलगडण्यापासून ते अंतराळातील नवनवीन मोहिमा आणि शोधांपर्यंत ही सफर आपल्याला नेहमीच नव्या क्षितिजांकडे घेऊन जाते. या सदरामध्ये आपण खगोलशास्त्रातील ताज्या घडामोडी, संशोधन आणि आकाशातील अद्भुत रहस्यांचा वेध घेणार आहोत.

आकाशातून येणाऱया अशनींचे आघात ही पृथ्वीवरील जीवनासाठी नेहमीच संकटमय घटना मानली गेली आहे. अशा आघातांनी भूभाग उद्ध्वस्त होतो, हवामान ढवळून निघते, परिसंस्था नष्ट होतात. पण विज्ञानाने आपली दृष्टी बदलायला लावली आहे. अलीकडेच संशोधनाने दाखवून दिले आहे की, अशनी आघात केवळ विनाश घडवून आणत नाही, तर कधी कधी नवीन जीवनाची उत्पत्तीही करतो. स्वीडनमधील लिनीयस विद्यापीठाच्या संशोधकांनी फिनलंडच्या पश्चिमेकडील लप्पाजार्वी विवरात एक क्रांतिकारी शोध लावला आहे. तब्बल 7.8 कोटी वर्षांपूर्वी झालेल्या प्रचंड अशनी आघातानंतर या विवरामध्ये सूक्ष्मजीवांनी आपली वसाहत उभारली होती हे त्यांनी ठोस पुराव्यांसह दाखवले आहे. ही माहिती ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या प्रतिष्ठित नियतकालिकात प्रसिद्ध झाली आहे.

आघात झाल्यानंतर निर्माण होणारी उष्ण जल व्यवस्था तेथे जीवनासाठी आश्रयदायी ठरली. खडकांत तयार झालेल्या भेगा आणि पोकळ्यांमध्ये गरम पाणी व खनिजे साठली. संशोधकांनी समस्थानिकांचे विश्लेषण आणि रेडिओआइसोटोप डेटिंग या पद्धतींनी सिद्ध केले की, येथे सल्फेट रिडक्शन ही सूक्ष्मजीवांशी निगडित प्रक्रिया घडत होती. म्हणजे सूक्ष्मजीव सल्फेटचे हायड्रोजन सल्फाइडमध्ये रूपांतर करतात आणि या प्रक्रियेत त्यांना आपले जीवन टिकवण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते. या क्रियेचे तापमान सुमारे 47 अंश सेल्सिअस होते, जे सूक्ष्मजीवांच्या वाढीस अत्यंत अनुकूल मानले जाते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार अशनी आघातानंतर जीवन उभे राहण्यासाठी किती वेळ लागतो याचा स्पष्ट कालपट समोर आला आहे.

दीर्घकाळ टिकणारी वसाहत
या विवरामध्ये जीवन काही दिवस, महिने किंवा शतकापुरतेच मर्यादित राहिले नाही, तर तब्बल एक कोटी वर्षांनंतरही तेथे मिथेनचे उत्पादन व उपयोग सुरू होता. याचा अर्थ असा की, अशनी आघातानंतरच्या विवरात सूक्ष्मजीव समुदाय दीर्घकाळ स्थिर राहू शकला. म्हणजेच अशनी आघात विवरे म्हणजे केवळ विवरे नाहीत तर जीवनाच्या दीर्घकालीन प्रयोगशाळा आहेत. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी चिक्सुलुब विवर (मेक्सिको) येथील अशनी आघातामुळे डायनोसॉर नामशेष झाले. तिथेही पुढे सूक्ष्मजीव दिसून आले. 1.8 अब्ज वर्षांपूर्वी सुडबरी विवर (कॅनडा) येथील प्रचंड अशनी आघातानंतर खनिजसंपत्ती व सूक्ष्मजीव क्रियांचे पुरावे सापडले आहेत. सुमारे दोन अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या दक्षिण आफ्रिकेतील व्रेडफोर्ट या पृथ्वीवरील सर्वात मोठय़ा व प्राचीन आघात विवरामध्ये नंतर जीवनाशी संबंधित बदल आढळले. या घटनांमुळे सिद्ध होते की, अशनी आघातानंतरचे वातावरण विध्वंसक असले तरी तिथे नंतर दीर्घकाळासाठी जीवनासाठी नवीन प्रयोगशाळा तयार होते.

पृथ्वीच्या दीर्घ इतिहासात लप्पाजार्वी विवर हा अनोखा पहिला पुरावा आहे, ज्यात जीवनाचा कालावधी ठामपणे सांगता आला आहे. या शोधाचे परिणाम केवळ पृथ्वीपुरते मर्यादित नाहीत. मंगळावरील गॅले विवर असो किंवा गुरूचा उपग्रह युरोपावरील विवरे, अशा विवरांमध्ये जीवन शोधण्याची संधी आहे. कदाचित प्रत्येक विनाशामध्ये नवीन जीवनाची बीजे दडलेली असतात. हा शोध खगोल-जीवशास्त्र या शाखेला नवे क्षितिज दाखवतो. आजपर्यंत आपण जीवनाच्या शोधासाठी पाण्याचे अस्तित्व शोधत होतो, पण आता आघाती विवरे हेही महत्त्वाचे निदर्शक ठरू शकतात. उद्या जेव्हा मानव मंगळावर जीवन शोधेल, तेव्हा त्याचा पहिला पुरावा कदाचित एखाद्या जुन्या विवरामध्येच मिळू शकेल.
(लेखिका खगोल अभ्यासक आहेत.)