
कोरोनाचे संकट असताना महापालिकेला साधे स्वतःचे रुग्णालय सुरू करता आले नाही, तसेच कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी तत्काळ उपाययोजनाही करता आल्या नाहीत, यासारखे दुर्दैव नसल्याची खंत व्यक्त करताना खासदार सुजय विखे यांनी स्वपक्षाचीच सत्ता असलेल्या नगर मनपातील सत्ताधाऱयांना घरचा आहेर दिला आहे. दरम्यान, सावेडीतील प्रस्तावित जागेत तत्काळ रुग्णालय उभारण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
नगर महापालिकेत आज कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, नगरसेवक अनिल बोरुडे, सुवेंद्र गांधी, भय्या गंधे, नरेंद्र कुलकर्णी, धनंजय जाधव, बारस्कर, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आदी उपस्थित होते.
खासदार डॉ. विखे म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर आपण योग्य उपाययोजना केल्या नाहीत. केवळ मंगलकार्यालये ताब्यात घेतली. मात्र, तेथील रुग्ण गंभीर झाल्यानंतर कुठे गेले, कोण कुणाला औषधे देत होते, कोण कुणावर उपचार करत होते, ते कुणालाच माहिती नाही. रुग्ण गंभीर झाल्यानंतर त्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर असलेले हॉस्पिटल शोधण्यासाठी तयारी करावी लागली. मग महापालिकेने काय केले, हा खरा प्रश्न आहे. महापालिका कोटय़वधी रुपये बूथ हॉस्पिटलला देते; मात्र आपण स्वतःचे हॉस्पिटल सुरू करू शकत नाही. उपायोजना करू शकत नाही, यासारखे दुर्दैव नाही.
आरोग्याचे काम करताना महापालिकेत समन्वयाचा अभाव दिसून आलेला आहे. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची अवस्था दयनीय असल्याचे सांगितले जाते. त्याठिकाणी तशी परिस्थिती असेल तर तत्काळ ते हॉस्पिटल काढून टाका व दुसऱया ठिकाणी हॉस्पिटल उभे करा, असेही ते म्हणाले.
महापौरपदासाठी भाजपकडे उमेदवारच नाही – डॉ. सुजय विखे
– नगरच्या महापौरपदाची निवडणूक होत आहे. राज्यामध्ये जसे आमचे संख्याबळ नाही, तसेच महापालिकेमध्येही नाही. शिवाय आमच्याकडे उमेदवारही नाही. त्यामुळे आम्ही महापौरपदावर दावा करण्याचे काहीच कारण नाही. गेल्या वेळी राष्ट्रवादीची साथ घेतली होती ही वस्तुस्थिती आहे. मात्र, त्यावेळी राज्यामध्ये महाविकास आघाडी नव्हती. आता राजकीय समीकरणेही बदलली आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार आलेले आहे, असेही खासदार सुजय विखे म्हणाले.

































































