महाराष्ट्राचे वाटोळे राष्ट्रवादी काँग्रेसनेच केले; डॉ. सुजय विखे पाटील यांचा आरोप

1952

राज्यात शिवसेना- भाजप युती सरकारने मोठी भरीव विकासकामे केलेली आहेत. याआधी 15 वर्षे राज्यात सत्तेत असणार्‍यांना साकळाई योजना मार्गी लावता आली नाही, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. विखे परिवाराला संपविण्यासाठी निघालेल्यांची अवस्था आज बिकट झाली आहे. निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याकडे उमेदवारच शिल्लक नाहीत,असा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्राचे वाटोळे राष्ट्रवादी काँग्रेसनेच केल्याचा आरोपही सुजय विखे पाटील यांनी केला. गुंडेगाव (ता. नगर) येथे विविध विकासकामांचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी खासदार दादा पाटील शेळके, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, राजाराम भापकर, जिल्हा परिषद सदस्या अनिता हराळ, सरपंच पल्लवी कुताळ आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. विखे पाटील म्हणाले, आत्तापर्यंत पंधरा वर्ष सत्तेत असणार्‍यांनी साकळाईचा प्रश्‍न सोडविला नाही आणि तेच जर पुन्हा साकळाई योजना करणार असल्याचे बोलत असतील तर त्यांच्या सभांना जावू नका. येणार्‍या साडेचार वर्षात साकळाई योजना मार्गी लावणार असल्याचे ते म्हणाले. विखे परिवाराला संपविण्यासाठी निघालेले आता संपून गेले आहेत. त्यामुळे मी 25 वर्ष खुर्ची सोडणार नसल्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी दादा पाटील शेळके , प्रा.शाशिकांत गाडे यांची भाषणे झाली.

आपली प्रतिक्रिया द्या