
सुमित फॅसिलिटीचा अमित साळुंखे हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या जवळचा माणूस आहे. या प्रकरणाची धागेदोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत येतात. हे प्रकरण ईडीकडे जाईल आणि साळुंखे याच्या चौकशीतून महाराष्ट्रातील 108 क्रमांकाच्या अॅम्ब्युलन्सचा घोटाळाही बाहेर येईल, असा दावा शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केला. अमित साळुंखे हा श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचा आर्थिक कणा आहे. सुमित फॅसिलिटीने 800 कोटी रुपयांचा रुग्णवाहिका घोटाळा केला. मी स्वतः हा विषय काढला होता. याचे सूत्रधार अमित साळुंखे आहेत. 650 कोटी रुपयांनी टेंडर वाढवलं गेलं, असे संजय राऊत म्हणाले.
‘ते’ दानशूर कोण?
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून वैद्यकीय, शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक उपक्रमांवर कोटय़वधी रुपये खर्च झाले आहेत. या पैशाचा स्रोत काय? ज्यांनी कोटय़वधी रुपये दिले ते दानशूर कोण? असे पत्र पंतप्रधान मोदी यांना लिहीत संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी वर्षभरापूर्वी केली आहे.