
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय मार्फत चौकशी करावी, याबाबत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार अशा सर्वांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या भेटीनंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “ज्यादिवशी दुर्दैवी घटना घडली त्यादिवशीपासूनच तपासाला सुरुवात केली आहे. दुर्देवी विमान अपघाताच्या संदर्भात आधीच केंद्र सरकारने आधीच स्वायत्त संस्था नेमलेल्या आहेत. तपास यंत्रणेने तपास सुरु केलेल्याचे घोषित केले आहे. मुख्यमंत्री महोदयांनीही सीबीआय तपास करावा असा आदेश दिलेला आहे. आम्ही सखोल तपासाची मागणी केली आहे. लवकरात लवकर तपासणी व्हावी आणि जनतेसमोर यावं. म्हणूनच आम्ही मुख्यमंत्री महोदयांशी भेट घेतली.”



























































