
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीचा सध्या धुराळा उडालेला असून अद्याप दोन टप्पे बाकी आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक अभिनेते, अभिनेत्रींनी विविध राजकीय पक्षांमध्ये प्रवेश केल्याचे दिसून आले. याच दरम्यान बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टी राजकारणामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याच्याशी संवाद साधला तेव्हा त्याने राजकारणामध्ये सध्यातरी येण्याचा कोणताही इरादा नसल्याचे स्पष्ट केले.
एका ऑनलाईन फिटनेस समुहाची घोषणा करण्यासाठी आलेल्या सुनील शेट्टीला प्रसारमाध्यमांनी राजकारणातील प्रवेशाबाबत प्रश्न विचारला. याला उत्तर देताना सुनील शेट्टी म्हणाला की, माझी रायकारणामध्य़े येण्याची सध्यातरी इच्छा नाही. जर मला राजकारणामध्ये येण्याची इच्छा असती तर ती माझे वय कमी असतानाच मी पूर्ण केली असती. राजकारणात आल्यानंतर विरोधकांनी माझ्यावर केलेली टीका सहन झाली नसती, त्यामुळे या सर्वांपासून दूर आहे, असेही तो म्हणाला.
राजकारणामध्ये येण्याची आपली इच्छा का नाही याबाबत बोलताना सुनील शेट्टी म्हणाला की, मला अशा राजकीय व्यक्तींसारखे बनण्यात स्वारस्य नाही जे नकली दात घालून बोलण्यात असमर्थ असतात, परंतु तसेच असतानाही महत्त्वाचे पद बळकावून बसतात. तसेच तरुण आणि डायनामीक व कार्यक्षम लोकांनी राजकारणामध्ये यावे असेही सुनील शेट्टी यावेळी म्हणाला.




























































