
हिंदुस्थानचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी हिंदुस्थानी क्रिकेट संघामध्ये भेदभाव होत असल्याचे स्पष्ट आणि परखड मत गुरुवारी व्यक्त केले. या संघात वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम आहेत. खेळाडू बघून नियम बदलले जातात. टीम इंडियामध्ये रविचंद्रन अश्विन व टी. नटराजन या क्रिकेटपटूंवर अन्याय होत आहे, असा सणसणीत स्ट्रेट ड्राइव्हही सुनील गावसकर यांनी यावेळी लगावला आहे.
सुनील गावसकर यांनी एका इंग्रजी संकेतस्थळावर लिहिलेल्या कॉलममध्ये आपले मत व्यक्त करताना म्हटले की, रविचंद्रन अश्विनला हिंदुस्थानी संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्याच्या गोलंदाजी क्षमतेत उणिवा नक्कीच नाहीत, पण संघाच्या बैठकांमध्ये तो आपले मत व्यक्त करतो. इतर खेळाडू फक्त मान हलवतात. मग त्या गोष्टींशी ते सहमत असो किंवा नसो. यामुळे मात्र रविचंद्रन अश्विनला टीम इंडियामध्ये सातत्याने संधी देण्यात येत नाही.
एका सामन्यातील अपयशाने संघाबाहेर होतो
रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 350च्या वर फलंदाज बाद केले आहेत. शिवाय त्याने चार कसोटी शतकेही झळकावली आहेत हेही विसरता कामा नये. अशा अष्टपैलू, हरहुन्नरी क्रिकेटपटूचे इतर देशांकडूनही कौतुक करण्यात येते. पण हिंदुस्थानात त्याच्याकडून एखाद्या लढतीत अपेक्षेनुसार कामगिरी झाली नाही तर त्याला दुसऱया सामन्यामधून संघाबाहेर काढण्यात येते. एखाद्या अनुभवी फलंदाजाला एका सामन्यात अपयश आल्यानंतर त्याच्यासोबत हे घडताना दिसत नाही. पण रविचंद्रन अश्विनसाठी वेगळे नियम तयार केले जातात, अशी टीकाही सुनील गावसकर यांनी यावेळी केली
त्याने अजून मुलीचा चेहराही पाहिलेला नाहीए
रविचंद्रन अश्विनप्रमाणे हिंदुस्थानी संघात आणखी एक खेळाडू आहे की ज्याच्यावर अन्याय होतोय, पण तो नुकताच संघाशी जोडला गेला असल्यामुळे हे प्रकरण तापलं नाहीए. त्याचे नाव टी. नटराजन आहे. विराट कोहलीने पत्नी अनुष्काच्या बाळंतपणासाठी तीन कसोटींमधून माघार घेतली. बीसीसीआयने त्याची रजा मंजूरही केली. टी. नटराजन याला आयपीएलदरम्यान मुलगी झाली, पण त्याने अद्याप तिचा चेहराही बघितलेला नाही. हा दौरा आटोपल्यानंतर तो जानेवारी महिन्यात आपल्या घरी जाईल, असे खडेबोल सुनील गावसकरांनी यावेळी संघ व्यवस्थापनासह बीसीसीआयलाही सुनावले आहेत.
कसोटी मालिकेत निवड नाही, मग थांबवले कशाला?
आयपीएलमध्ये ठसा उमटवल्यानंतर टी. नटराजनला ऑस्ट्रेलियातील वन डे व टी-20 मालिकेसाठी निवडण्यात आले. त्यानंतर कसोटी मालिकेसाठी त्याची टीम इंडियामध्ये निवड करण्यात आली नाही. पण या मालिकेदरम्यान त्याला नेट बॉलर म्हणून ऑस्ट्रेलियातच ठेवण्यात आले. कर्णधार विराट कोहली पहिल्या बाळासाठी रजा घेऊ शकतो, पण नवीन खेळाडूला रजा देण्यात येत नाही. हे समजण्यापलीकडे आहे. वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम, यालाच म्हणतात हिंदुस्थानी क्रिकेट, असे सुनील गावसकर स्पष्टपणे म्हणाले.



























































