पीएनबी घोटाळा जुनी गोष्ट, बँक आता फायद्यात दिसेल – एमडी सुनील मेहता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । तिरुवनंतपुरम

पंजाब नॅशनल बँक आता हिरेव्यापारी नीरव मोदीने केलेल्या 14 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यामुळे झालेल्या नुकसानीतून बाहेर पडत आहे. या आर्थिक वर्षात बँक फायद्यात असल्याचे आकडेवारीवरून दिसून येईल, असा विश्वास पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी व्यक्त केला आहे. नीरव मोदीचा पीएनबी घोटाळा ही जुनी गोष्ट आहे. तो भूतकाळ असून आता नव्या आर्थिक वर्षात बँक फायद्यात दिसेल असे ते म्हणाले. केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मदतनिधी देण्यासाठी ते केरळमध्ये आले होते. त्यावेळी झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात मेहता यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना 5 कोटींचा निधी दिला आहे. पीएनबीच्या कर्मचाऱ्यांनी आणि माजी कर्मचाऱ्यांनी हा निधी जमवला आहे. केरळमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर राज्यातील जनतेचे पुनर्वसन करण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे.

पीएनबी घोटाळ्यातून झालेल्या नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी बँकेने 2018-19 या आर्थिक वर्षात अनेक पावले उचलली आहेत. त्यामुळे बँक आता फायद्यात येईल असे त्यांनी सांगितले. बँकेने उचललेल्या विविध पावलांमुळे आम्ही मोठ्या घोटाळ्यातून बाहेर पडू शकतो, हे सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात बँक फायद्यात दिसेल असे ते म्हणाले. 2018-19 या आर्थिक वर्षाच्या जूनच्या तिमाहीत बँकेला 940 कोटींचा तोटा झाला होता. तर 2017-18 या वर्षात तोट्याचा आकडा 342.40 कोटी रुपये एवढा होता.

बँकेची ३० ऑक्टोबरला जनरल मिटींग होणार आहे. त्यात परवानगी मिळाल्यावर बँकेसाठी फंड इंफ्यूजन करण्यात येणार आहे. बँकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी बोर्डाकडून बँकेला ५ हजार ३४१ कोटींच्या निधीची गरज असल्याचे मेहता यांनी सांगितले. या निधीचा उपयोग बँकेच्या आर्थिक वाढीसाठी केला जाणार आहे.