
विक्रोळीतील सूर्यनगर झोपडपट्टीवर पावसाळय़ात दरड कोसळण्याच्या घटना घडून जीवित व वित्तहानी होते. त्यामुळे पावसाळा आला की तेथील रहिवासी भीतीच्या सावटाखालीच जगत असतात. दरडी कोसळून अपघात होऊ नयेत म्हणून शासनाने तातडीने तिथे उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील राऊत यांनी केली.
आमदार सुनील राऊत यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे हा विषय प्रभावीपणे मांडला. विक्रोळीचे सूर्यनगर हे डोंगरपायथ्याशी आहे. पावसाळय़ात तिथे दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. सप्टेंबर 2017 मध्ये तिथे दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला होता आणि मोठय़ा प्रमाणात वित्तहानीही झाली होती. 2019 मध्येही दरड कोसळून सूर्यनगरातील सात जण मृत्युमुखी पडले होते. 16 जून 2020 मध्ये दरड कोसळून अनेक झोपडय़ा गाडल्या गेल्या होत्या. सुदैवाने त्यावेळी जीवितहानी झाली नव्हती, परंतु झोपडय़ांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. 18 जुलै 2021 रोजी दरड कोसळून 11 जणांचा बळी गेला होता, असे सुनील राऊत यांनी सभागृहात सांगितले.
सूर्यनगरमध्ये पावसाळय़ात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने रहिवासी दहशतीखाली असतात. त्यांची रात्रीची झोप उडाली आहे. शासनाने या रहिवाशांच्या संरक्षणासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे, असे आमदार सुनील राऊत यांनी सभागृहात सांगितले.



























































