
ड्रायव्हिंग करताना गिरवलेले राजकीय शिक्षणाचे कित्ते, राजकीय नेत्यांच्या आयुष्यातील ड्रायव्हरचे महत्त्व, निवडणूक रिंगणातील एकाच नावाचे नऊ उमेदवार अशा असंख्य राजकीय किश्श्यांची मैफल आज खासदार सुनील तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळय़ाच्या निमित्ताने रंगली.
सुनील तटकरे यांच्या ‘अभिनंदन… अभिवादन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख उपस्थित होते.
ड्रायव्हर ते राजकारणी
यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुनील तटकरे हे राजकारणात कसे आले त्याचा किस्सा सांगितला. तटकरेंचे वडील राजकारणात होते तेव्हा सुनील हे त्यांच्या गाडीचे ड्रायव्हर म्हणून जात. वडील कोणाशी कसे बोलतात याचा त्यांनी पूर्ण अभ्यास केला. त्यामुळे त्यांना ड्रायव्हरची भूमिका निभावतानाच राजकारणात प्रवेश करता आला.

























































